March For Marriage: 'कुणी मुलगी देता का मुलगी', लग्नाळू तरुणांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा (Video)
समाजात अविवाहीत तरुणांची संख्या प्रचंड प्रमाणावर आहे. हाताला काम नाही, काम असले तरी त्याचा विवाहासाठी (Marriage) उपयोग नाही अशा स्थितीत अविवाहीत तरुणांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे.
Solapur News: मुलामुलींच्या जन्मदरात असलेली तफावत म्हणा किंवा महागाई, बेरोजगारी आणि त्याच्याच जोडीला असलेल्या अवास्तव अपेक्षा म्हणून म्हणा. समाजात अविवाहीत तरुणांची संख्या प्रचंड प्रमाणावर आहे. हाताला काम नाही, काम असले तरी त्याचा विवाहासाठी (Marriage) उपयोग नाही अशा स्थितीत अविवाहीत तरुणांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे. अशा या तरुणांच्या शारीरिक आणि मानसीक समस्याही मोठ्या आहेत. परिणामी अनेक कारणांमुळे लग्न होत नसलेल्या अविवाहीत तरुणांनी चक्क सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरच मोर्चा (Unmarried Youth March on Solapur Collectorate) काढला आहे. विशेष म्हणजे 'कुणी मुलगी देतं का मुलगी' असे फलक घेऊन आणि नवरदेवाच्या वेशात घोड्यावर बसून हा मार्चा काढण्यात आला आहे. सोलापूर(Solapur) येथे ज्योती क्रांती संघटनेकडून हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाचे कारण आणि त्यात बहुसंख्येने सहभागी झालेल्या तरुणांना पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. काहींनी गमतीने हा कसला मोर्चा असेही उद्गार काढले. परंतू, मोर्चाचे कारण आणि त्याची पार्श्वभूमी पाहिली तर एका भयान वास्तवाचा उलघडा होतो. सोलापुरातील होम मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी तरुण मोठ्या आशेने आणि उत्साहाने सहभागी झाले होते. लग्नासाठी मुलगी द्या अशी या तरुणांची मागणी होती. मोर्चेकरी तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले. (हेही वाचा, प्रेमविवाह केला आहे? की करायचा आहे? जाणून घ्या फायदे तोटे)
ट्विट
दरम्यान, समाजात मुलींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होते आहे. त्यातही गर्भलिंग निदान कायद्याची अंमलबजावणी हवी तशी होताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मुलींचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. सहाजिकच मुलींचे प्रमाण घटले आणि तुलनेत मुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले तर एक असमानता निर्माण होते. परिणामी मुलांचे विवाह ठरण्यास मोठाच अडथळा येतो. त्यामुळे सहाजिकच अविवाहीत मुलांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे मुलांचे विवाह होण्यासाठी सरकारनेच आता हातभार लावावा अशी या तरुणांची मागणी आहे.