Maharashtra Unlock 1: केस कापा पण दाढी करु नका! महाराष्ट्रात केशकर्तनालयं सुरु करण्यास परवानगी- राज्य सरकार
आशा सेविकांना या आधी 1400 इतके मानधन मिळत होते. मात्र येत्या 1 जुलै 2020 पासून आशा वर्कर्सचे मानधन 3000 इतके केले जाणार आहे.
राज्यातील केशकर्तनाय (Salon) सुरु करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, केशकर्तनालयामध्ये केवळ केस कापण्यासच (Haircut) मान्यता आहे. त्यामुळे ग्राहकाला अथवा केशकर्तनकाराला केशकर्तनालयात दाढी (Shaving) करण्यास मान्यता असणार नाही. राज्यमंत्रीमंडळाची एक बैठक आज पाडली. त्यानंतर राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी ही माहिती दिली. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊन एकमध्ये नियमांना शिथिलता देत काही व्यवसाय सुरु करण्यास परवानगी होती. मात्र, केशकर्तनालय, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आदींना मान्यता नव्हती. त्यामुळे हे व्यवसाय सुरु करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी वारंवार होत होती. अखेर केवळ केशकर्तनालय सुरु करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
अनिल परब यांनी माहिती देताना या वेळी सांगितले की, येत्या 28 जूनपासून महाराष्ट्रात केवळ केशकर्तनालय सुरु करण्यासच मान्यता दिली आहे. इतर सलून, ब्युटी पार्लर, स्पा आदी सुरु करण्याची मान्यता नाही. तसेच, केशकर्तनालयात गेल्यास केवळ केस कापण्यास मान्यता आहे. केस कापताना ग्राहक आणि केस कापणारा अशा दोघांनीही तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. तसेच, सर्व नियमांचे पालन करुनच दुकानदारांनी दुकाने सुरु करायची आहेत. जे दुकानदार कायद्याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यभरातील आशा सेविकांचे मानधन वाढविण्याचा निर्णय झाल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली. आशा सेविकांना या आधी 1400 इतके मानधन मिळत होते. मात्र येत्या 1 जुलै 2020 पासून आशा वर्कर्सचे मानधन 3000 इतके केले जाणार आहे. (हेही वाचा, Salon, Beauty Parlor Will Start Soon In Maharashtra: सलून, ब्युटी पार्लर सुरु करण्याबाबत महाराष्ट्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत; राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती)
लॉकडाऊ शिथील करण्याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता परब म्हणाले की, लॉकडाऊन हटवताना असा थेट हटवता येत नाही. बऱ्याच गोष्टींचे निरिक्षण करावे लागतात. नागरिक, समाज यांना होणाऱ्या फायद्या तोट्यांचा विचार करावा लागतो. तसेच कोरोन व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर हा विचार अधिक काळजीपूर्वक करावा लागतो. त्यामुळे हळूहळू लॉकडाऊन हटवता येईल, असेही परब म्हणाले.