वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी; अमित देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा

कोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे (Coronavirus Lockdown) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2020 परिक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

अमित देशमुख व राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना व्हायरस लॉक डाऊनमुळे (Coronavirus Lockdown) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2020 परिक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षांबाबत, वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलपती अमित विलासराव देशमुख (Amit Deshmukh) यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची राजभवन भेट घेतली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे. याबाबत अमित देशमुख व राज्यपाल यांच्यामध्ये चर्चा झाली.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. याबाबत लवकरच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. सध्या तरी 15 जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, मात्र काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास याबाबत परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येतील.  याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील गोष्टी निश्चित केल्या जातील, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. (हेही वाचा: निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे 2 दिवसांत सादर करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश)

15 जुलैपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी करावी असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले आहे. दरम्यान नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतात. यामध्ये मेडिकल, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी त्याचप्रमाणे नर्सिंग परीक्षांचा समावेश आहे. मात्र लॉक डाऊनमुळे या परीक्षांबाबत निश्चित माहिती मिळत नव्हती. तसेच याआधी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील रद्द कराव्यात, अशा मागणीचे निवेदन भाजपा विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष ऋषिकेश आहेर यांच्या वतीने देण्यात आले होते. मात्र आता विद्यापीठाच्या निर्णयामुळे परीक्षांबाबत संभ्रम दूर झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement