Umesh Kolhe Murder Case: धार्मिक शत्रुत्वाला चालना देण्यासाठी एका गटाचा मोठा कट NIA कडून FIR मध्ये माहिती
एनआयए कडून 2 जुलै दिवशी उमेश कोल्हे मृत्यू प्रकरणी पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे
21 जून च्या रात्री अमरावती मध्ये फार्मासिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe) चा निर्घुण खून करण्यात आला. त्यानंतर याचा तपास एनआयए कडे सोपावण्यात आला आहे. आज या प्रकरणामध्ये विशिष्ट समुदायामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा खून झाल्याची माहिती एनआयए एफआयआर मधून समोर आली आहे. 54 वर्षीय उमेश कोल्हे यांना नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी ठार करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासंबंधी त्यांना धमक्या देखील आल्या होत्या. दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या हत्याकांडामध्ये सार्या पैलूंनी तपास करण्याचे एनआयए ला निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान अमरावती पोलिसांकडून कोणालाही प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष धमक्या येत असल्यास जवळच्या पोलिस स्टेशनला कळवावे तुमची माहिती गुप्त ठेवली जाईल असं आवाहन देखील करण्यात आले होते. हे देखील नक्की वाचा: Umesh Kolhe Murder Case: 'परकीय शक्ती देशात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत', अमरावती हत्याकांडावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया.
एनआयए कडून 2 जुलै दिवशी उमेश कोल्हे मृत्यू प्रकरणी पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये Unlawful Activities (Prevention) Act, 1967 अन्वये आयपीसी च्या सेक्शन 16,18,20 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. 21 जूनच्या रात्री 10.30 च्या सुमारास घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. अमरावती मध्ये ते घनश्याम नगर परिसरामध्ये राहत होते.
मुदस्सीर अहमद, शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक, शोएब खान, अतीब रशीद, युसूफ खान बहादूर खान आणि शाहीम अहमद फिरोज अहमद अशी या प्रकरणातील संशयितांची नावे आहेत. या सर्वांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली आहे. एनआयएने बुधवारी या प्रकरणात 13 ठिकाणी शोध घेतला आणि द्वेषयुक्त संदेश पसरवणाऱ्या पॅम्प्लेट्ससह विविध दोषी कागदपत्रे जप्त केली आहेत.