President Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भातील ममता बॅनर्जींच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत; शिवसेनेने सांगितलं 'हे' कारण
शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांचा 15 जूनचा कार्यक्रम आधीच ठरलेला असल्याने ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
President Election 2022: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Benarjee) यांनी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात (Presidential Election) बैठक बोलावली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) उपस्थित राहणार नाहीत. ही बैठक 15 जून रोजी होणार आहे. शिवसेनेच्या (Shivsena) वतीने या बैठकीला कोण उपस्थित राहणार, याबाबत सध्या निर्णय झालेला नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांचा 15 जूनचा कार्यक्रम आधीच ठरलेला असल्याने ते या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
त्याचवेळी शिवसेनेने या बैठकीत विरोधक ज्या उमेदवाराचे नाव सुचवतील त्याला शिवसेना पाठींबा देईल, असं स्पष्ट केलं आहे. याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांना 15 जूनला दिल्लीत होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे. त्यावेळी आम्ही अयोध्येत असल्याने आमच्या पक्षाचे एक प्रमुख नेते बैठकीत भाग घेतील. (हेही वाचा -Child Labour Helpline: बालमजुरी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइनची घोषणा, माहिती देणाऱ्याचे नाव ठेवणार गुप्त)
दरम्यान, राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ येताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी 15 जून रोजी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत होणाऱ्या संयुक्त बैठकीत सहभागी होणार आहेत. यासाठी ममता यांनी 22 नेत्यांना पत्रही लिहिले आहे.
यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही पत्र लिहिले आहे.
ममता बॅनर्जी यांच्या पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी) ने एका निवेदनात म्हटले आहे की, आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे आणि नेत्यांशी संपर्क साधला आहे. त्यांनी सर्व पुरोगामी विरोधी नेत्यांना 15 जून रोजी कॉन्स्टिट्युशन क्लब, नवी दिल्ली येथे दुपारी 3 वाजता बैठक घेण्याचे आवाहन केले आहे.