मुख्यमंत्री म्हणून नावाची घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचे मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन

या घोषणेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले व त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केले.

उद्धव ठाकरेंचे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्र विकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आजच्या संयुक्त बैठकीत नेतेपदी तसेच राज्याचे आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. उद्धव ठाकरे यांचा ग्रँड शपथविधी सोहळा 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता शिवतीर्थावर पार पडेल. या घोषणेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले व त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीला वंदन केले. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आज बाळासाहेबांची आठवण झाली.

महाविकास आघाडीची संयुक्त बैठक आज पार पडली. त्यामध्ये ठरल्याप्रमाणे जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले. त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पहिल्यांदाच हा प्रसंग माझ्यावर येत आहे त्यामुळे कोणाकोणाचे आभार मानावे हे समजत नाही. आज मला बाळासाहेबांची फार आठवण येत आहे. संकटात बाळासाहेबांची आठवण येत नाही मात्र त्यानंतरच्या विजयात नेहमीच बाळासाहेबांची आठवण येते.’ ही बैठक पार पडल्यावर त्यांनी तडक मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन करून आशीर्वाद घेतले.

(हेही वाचा: उद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, महाविकासआघाडीकडून अधिकृत घोषणा; 'या' दिवशी शिवतीर्थावर पार पडणार ग्रँड शपथविधी सोहळा)

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यात देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे बळ आणखीनच वाढले. त्यानंतर राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शिवसेनेची संयुक्त बैठक हॉटेल ट्रायडंट येथे पार पडली. यावेळी तीनही पक्षांसोबत इतरही पक्षांचे महत्वाचे नेते उपस्थित होते.