MVA On CM Face: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे यांनी शरद पवार, नाना पटोले यांच्या उपस्थितीत थेटच सांगितले

ज्यास शरद पवार आणि नाना पटोले यांनीही सहमती दर्शवली.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections) ला सामोरे जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार का? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकासाघाडीची एक पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेस शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नाना पोटोले यांच्यासह मविआ घटक पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. पत्रकारांनी मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे यांनी त्याकडे थेट दुर्लक्ष करत 'महायुति यांना आधी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू द्या, त्यानंतर आम्ही सर्वांना कळवू की आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण आहे. सरकारमध्ये असल्याने महायुतीने आधी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा', असे ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.

CM पदावरुन थेट मविआचे थेट महायुतीला आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. ते पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याविषयी जे काही म्हणाले ते अगदी स्पष्ट आहे". दरम्यान, काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस (SP) यांचा समावेश असलेल्या एमव्हीए युतीची विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत युतीमध्ये अद्याप एकमत झालेले नाही. शिवसेना (यूबीटी) ने उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे केले आहे. मात्र त्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनीही प्रतिसाद दिला नाही. (हेह वाचा, Uddhav Thackeray Dasara Melava 2024: "अदाणी आमची जान, आम्ही शेठजींचे श्वान" उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका)

ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री- पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच पुनरुच्चार केला की, सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला पारंपरिकपणे सर्वोच्च पद मिळते आणि निवडणुकीपूर्वी विरोधकांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची प्रथा नाही. मुंबईतील इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना चव्हाण यांनी सुचवले की मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील निर्णय प्रत्येक पक्ष निवडणुकीत किती जागा जिंकतो यावर आधारित असेल. (हेही वाचा, Uddhav Thackeray Reaction On Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; काय म्हणाले? जाणून घ्या)

दरम्यान, गेल्या महिन्यात शरद पवार यांनीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा इतक्या लवकर जाहीर करण्याची आवश्यकता नाही, असे सांगतानाच एमव्हीए सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल असे म्हटले होते. निवडणुकांच्या निकालांच्या आधारे मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेतला जाईल, यावर त्यांनी भर दिला. 'मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर न करण्यात कोणताही अडथळा नाही. हा निर्णय आकड्यांच्या आधारे व्हायला हवा, असे पवार म्हणाले. या मुद्द्यावर आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद असले तरी, उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच महाराष्ट्र वाचवण्यासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने मांडलेल्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती.