उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर; 24 नोव्हेंबर ची तारीख पुढे ढकलली
सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यावर मगच हा अयोध्येत दर्शन घेण्यासाठी ठाकरे रवाना होतील असा अंदाज आहे.
भारताच्या इतिहासातील बहुप्रतीक्षित अयोध्या (Ayodhya Ram Mandir) निकाल लागताच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन 24 नोव्हेंबर रोजी अयोध्या दौरा करणार असल्याचे सांगितले होते. मात्र सध्या महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) पार्श्वभूमीवर रामलल्लाच्या दर्शनाचा दौरा आता पुढे ढकलण्यात आल्याचे समजत आहे. याशिवाय अयोध्येचा निकाल लागून काहीच दिवस झाल्याने अजूनही अयोध्या परिसरात संवेदनशील वातावरण आहे ज्यामुळे कायदेशीर अडचणी येत आहेत असे उद्धव यांनी सांगितले. यामुळे लांबणीवर पडलेल्या दौऱ्याची पुढील तारीख जाहीर केली नसून सत्ता स्थापनेचा तिढा सुटल्यावर मगच हा अयोध्येत दर्शन घेण्यासाठी ठाकरे रवाना होतील असा अंदाज आहे. (अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा सुटावा यासाठी 81 वर्षीय वृद्ध महिलेने 27 वर्ष केलेला उपवास सुटणार)
अयोध्येचा निकाल राम मंदिराच्या बाजूने लागल्यावर उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी सांगितल्यानुसार, मागील वर्षी म्हणजेच 24 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांनी शिवसैनिकांसोबत मिळून अयोध्याचा दौरा केला होता, यावेळी त्यांनी आपल्यासोबत शिव छत्रपतींचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्यावरील माती आपल्यासोबत अयोध्येत नेली होती, या मातीच्या चमत्कारानेच अयोध्येचा निकाल राम मंदिराच्या बाजूने लागण्यास मदत झाली म्हणूनच येत्या 24 नोव्हेंबर रोजी वर्षपूर्ती निमित्ताने पुन्हा एकदा अयोध्या दौरा करणार असल्याचे उद्धव यांनी म्हंटले होते. (अयोध्या प्रकरणात राम मंदिराच्या बाजूने निकाल येण्यास फायद्याचे ठरले 'हे' 3 महत्वाचे मुद्दे)
दरम्यान, महाराष्ट्र सरकार स्थापना हा सद्य घडीचा मोठा व गंभीर तिढा समोर असताना अयोध्येला जाण्याचे थोडे लांबणीवर टाकण्यात आले आहे. शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपासोबत युती करताना राम मंदिर हा देखील एक महत्वाचा मुद्दा होता. आता राम मंदिर उभारणीसाठी जरी हिरवा कंदील मिळाला असला तरी भाजपा-शिवसेनेत फूट पडून युती तुटली आहे. दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी सेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची कास धरल्याचे दिसत आहे. या प्रकरणी अद्याप तिन्ही पक्षांनी ठोस भूमिका मांडली नाहीये, आज, दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.