Challenges of Uddhav Thackeray and Shiv Sena: उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेसमोरील आव्हाने, घ्या जाणून

त्यामुळे ते पदावरुन पायऊतार झाले असले तरी त्यांच्यासमोरील आव्हाने संपली नाहीत. उलट ही आव्हाने आता अधिक ठळक झाली आहेत.

Uddhav Thackeray and Shiv Sena | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ते पदावरुन पायऊतार झाले असले तरी त्यांच्यासमोरील आव्हाने संपली नाहीत. उलट ही आव्हाने आता अधिक ठळक झाली आहेत. एका बाजूला शिवसेनेत झालेली बंडाळी आणि दुसऱ्या बाजूला अचानक गेलेली सत्ता. त्यामुळे नेहमीच शांत, संयमी आणि प्रसंगी आक्रमक असलेले उद्धव ठाकरे आगामी काळात या आव्हानांचा सामना कसे करतात याबाबत उत्सुकता आहे. ही आव्हाने नेमकी कोणती? घ्या जाणून

डॅमेज कंट्रोल

शिवसेना ही प्रचंड शिस्तप्रिय संघटान म्हणून ओळखली जाते. असे असतानाही शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर बंडाळी झाली. शिसेनेत यापूर्वीही छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे अशी बंडं झाली आहेत. पण त्याने जितका फटका बसला नाही त्याहून कितीतरी अधिकचा फटका एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आमदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी तळागाळात कार्यकर्ता असलेल्या शिवसैनिकांना डॅमेज कंट्रोल करत मतोश्री आणि शिवसेना भवन यांच्यासोबत जोडून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Politcal Crisis: 'लाठ्या खाऊ, तुरुंगात जाऊ, पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ'- MP Sanjay Raut)

सामान्य कार्यकर्त्यांशी संपर्क

उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री पदावर असताना नेहमीच एक आरोप केला गेला. तो असा की, उद्धव ठाकरे हे कोणालाच वेळ देत नाहीत. ते कधी आमदारांना वेळ देत नाहीत तसेच ते सर्वसामान्य शिवसैनिकांनाही वेळ देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप खोडून काढण्याची त्यांना खरे तर ही संधी आहे. अर्थात, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमत्री पद सोडताना केलेल्या शेवटच्या भाषणातही त्यांनी म्हटले आहे की, आता मी पुन्हा शिवसेना भवनात बसण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे सामान्य शिवसैनिकांनी जोडून घेणे हे त्यांना पुन्हा एकदा करावे लागणार आहे.

नवे नेतृत्व घडविणे

उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा शिवसेनेत नवे नेतृत्व घडवावे लागणार आहे. संघटनेतील महत्त्वाची पदे असलेले आमदारच पक्ष सोडून गेल्याने शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शिवसेनेत संघटना म्हणून निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्याचे मोठे आणि महत्त्वाचे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे संघटनेतील चांगले चेहरे शोधून या नव्या चेहऱ्यांना घडविणे हे मोठे आव्हानात्मक असणार आहे.

शिवसेना कोणाची?

या सर्वात महत्त्वाचे आव्हान असणार आहे ते म्हणजे शिवसेना कोणाची. कारण विधिमंडळात शिवसेनेच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना असल्याचे दिसते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे ही शिवसेना आपलीच असल्याचा दावा करु शकतात. शिंदे यांच्या वकीलाने न्यायालयातही हा दावा केला आहे. त्यामुळे ही शिवसेना आपलीच आहे हे उद्धव ठाकरे यांना प्रचंड कार्यक्षमतेच्या जोरावर दाखवून द्यावे लागेल.