Oppose Hindi language Compulsion: हिंदी भाषा सक्तीस तीव्र विरोध; ठाकरे बंधू आक्रमक; मुंबई येथे 6 जुलै रोजी भव्य मोर्चा

महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करत हिंदी भाषा सक्तीची करण्यास तीव्र विरोध होत आहे. या विरोधाचे जोरदार पडसाद मुंबईमध्ये उमटत असून येत्या 6 जुलै रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray_Raj Thackeray | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

शिक्षण धोरणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या बहाण्याने महाराष्ट्र राज्यात हिंदी भाषा सक्तीची (Hindi Language Compulsion) करण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या छुप्या प्रयत्नांना तीव्र विरोध होत आहेत. हिंदी सक्तीविरोधात शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि  मनसे (MNS) पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  हे दोन्ही  बंधू आक्रमक झाले आहेत. दोन्ही बंधूंनी मुंबई येथील आयोजित वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत हा विरोध निकराचा असल्याचे स्पष्ट केले.

ठाकरे बंधूंच्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदा

शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना पक्षाचा जन्मच मुळात भूमिपुत्रांसाठी हक्काच्या लढ्यासाठी झाला आहे. त्यामुळेच यांना राज्यातन शिवसेना संपवायची आहे. आज शिवसेनेतील गद्दार जे मिंधेपणाने त्यांच्यासोबत (भाजप) राहत आहेत. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सांगण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. तर मनसे (MNS) पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यानी घेतलेल्या बैठकीचा दाखला देत, हिंदी सक्ती मान्य नसल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांनी 6 जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधात एक भव्य मोर्चा काढणार असल्याचे सांगितले. (हेही वाचा, महाराष्ट्रात शालेय शिक्षणात तिसरी भाषा हिंदी अनिवार्य करण्यावरून मनसे आक्रमक; कार्यकर्त्यांचा दुकानदारांना पाठ्यपुस्तकं न विकण्याचा इशारा)

हिंदी सक्ती रद्द होईपर्यंत लढा सुरुच राहणार

हिंदी भाषा सक्ती विरोधात प्रा. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील एका समन्वय समितीने शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीतील चर्चेनंतर उद्धव यांची पत्रकार परिषद पार पडली. या बैठकीत उद्धव यांनी राज्य आणि केंद्र सरकारसोबतच एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, आज सरकारमध्ये बसून हिंदी सक्ती धोरणाबाबत मिंधेपणाने मौन बाळगून आहे त्या शिवसेनेतील गद्दरांना बाळासाहेबांचे विचार सांगण्याची गरज आहे. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना मराठी संदर्भात अनेक निर्णय घेतले. खास करुन भाषा भवनाचा निर्णय घेतला गेला. पण आजवर नव्या सरकारने त्या भवनाची एक विटही रचली नाही. ती जागासुद्धा बिल्डरला दिली की काय? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. त्याच वेळी हिंदी सक्ती रद्द होत नाही, तोवर लढा सुरुच राहणार, असेही ते म्हणाले.

भव्य मोर्चाचे आयोजन

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. पण, राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचे राज यांनी पत्रकार परिषदे स्पष्टपणे सांगितले. इतकेच नव्हे तर, सरकारची भूमिका आम्हाला मान्य नाही. त्यामुळे ती पटवून देण्याचा आणि घेण्याचा प्रश्नच नाही. सरकारच्या भाषासक्ती धोरणाचा आम्ही तीव्र विरोध करतो. सरकारच्या धोरणाविरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही केवळ मराठी हाच अजेंडा घेऊन येत्या 6 जुलै रोजी एक भव्य मोर्चा काढत आहोत. या मोर्चात कोणताही झेंडा असणार नाही. त्यामुळे या मोर्चात सर्व क्षेत्रातील मंडळींनी सहभागी होणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे म्हणाले. शिवाय, या मोर्चाला कोण येते आणि कोण येणार नाही, हे सुद्धा मला पाहायचे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement