उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीला राम राम, 14 सप्टेंबर रोजी पीएम नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार उदयनराजे 14 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी ते मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादीचे (NCP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाबाबत खूप दिवस चर्चा चालू होत्या. आज पुण्यात उदयनराजे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली आणि या मुद्द्याला पूर्णविराम मिळाला आहे. या चर्चेतील निर्णय आता बाहेर आला असून त्यानुसार राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली देखील चालू झाल्या आहेत. उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित झाले असल्याचे समजते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार उदयनराजे 14 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी ते मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत.
शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उदयनराजे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्याशी देखील चर्चा झाली. याबाबत तब्बल 5 तास उदयनराजे यांनी विचार केला व राष्ट्रवादीला राम राम करण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवार, म्हणजेच 14 सप्टेंबरचा दिवस हा उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशासाठी निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. मुख्य म्हणजे हा सोहळा राजधानी दिल्ली इथे पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. (हेही वाचा: खासदार उदयनराजे भोसले भाजपात आल्यास आनंदच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भावना)
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले. हे पाहून अनेक पक्षांमधील मात्तबर आसामींनी वाऱ्याप्रमाणे दिशा बदलत भाजपचा हात पकडला. महाराष्ट्रामध्ये गेले अनेक महिने हे तोडफोडीचे राजकारण सुरु आहे. आता भाजपमध्ये सामील होणाऱ्या पुढच्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वात जवळचे समजले जाणारे उदयनराजे भोसले यांचे नावही सामील झाले आहे. पक्षाने अनेक वेळा सांगूनही आपल्याला काहीच दिले नाही अशी उदयनराजे यांची भावना होती. याबात त्यांनी अनेकवेळा आपली नाराजी व्यक्त करून दाखवली होती/