2 Years of Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षपूर्ती; 'गंभीर संकटातही खंबीर महाराष्ट्राची परंपरा सरकारने कायम राखली'- उपमुख्यमंत्री अजित पवार
या आव्हानांचा सामना करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, राज्यातली विकासकामे थांबणार नाहीत. विकासाची प्रक्रिया अखंड, निरंतर सुरु राहील याची संपूर्ण काळजी घेण्यात आली
'महाविकास आघाडी सरकारनं दोन वर्षांच्या कारकिर्दीत राज्यासमोरच्या प्रत्येक आव्हानावर यशस्वी मात केली. जनतेच्या आशा, आकांशा, अपेक्षांवर खरं उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निष्ठापूर्वक, प्रामाणिक प्रयत्न केला. कृषी, उद्योग, वीज, व्यापार, शिक्षण, सहकार, साहित्य, कला, नाट्य, संस्कृती, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचं अव्वल स्थान कायम रहावं. नागरिकांमध्ये एकता, समता, बंधुतेची भावना वाढावी. सर्व समाजघटकांना विकासाची समान संधी उपलब्ध व्हावी. महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या कल्याणासाठी सर्वांना सोबत घेऊन यापुढेही निष्ठेनं काम करीत राहील. दोन वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या सर्वांचं मी मन:पूर्वक आभार मानतो. सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो', अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त सर्वांचे आभार मानले असून राज्यातील जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार मानताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील सत्तास्थापनेला आज दोन वर्षे होत आहेत. दोन वर्षांपूर्वी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आलं. या दोन वर्षांच्या काळात राज्यावर कोरोना, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळासारखी अनेक नैसर्गिक संकटं आली. कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली. त्याचा उद्योग, व्यापार, अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. संकटं किती मोठी असली तरी महाराष्ट्र कधी खचला नाही. कुणापुढे झुकला नाही. संकटं जितकी गंभीर.. तितका महाराष्ट्र खंबीर… हा इतिहास आहे. महाविकास आघाडी सरकारनं ती परंपरा कायम राखली. महाराष्ट्राच्या प्रगतीला खीळ बसू दिली नाही. प्रत्येक संकटाचा यशस्वी मुकाबला करण्याची परंपरा महाविकास आघाडी सरकारनंही कायम ठेवली. राज्यातील प्रत्येकाला सोबत, विश्वासात घेऊन सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं, एकजुटीनं राज्यावरच्या संकटावर मात केली. प्रत्येक महाराष्ट्रवासियाला याचा अभिमान आहे. (हेही वाचा: महाविकासआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, शिवसेना-भाजप पुन्हा युती; रामदास आठवले यांची भविष्यवाणी)
राज्यावरचं कोरोना संकट अभूतपूर्व असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, फार्मासिस्ट, सफाई कामगार, पोलिस, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनं जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरोधी लढ्यात अमूल्य योगदान दिलं आहे. या कोरोनायोद्ध्यांचं उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले असून कोरोनायोद्ध्यांचा त्याग महाराष्ट्र कायम लक्षात ठेवील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
कोरोना संकटांच्या बरोबरीनं राज्यासमोर आर्थिक आव्हानंही उभं राहिली. या आव्हानांचा सामना करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, राज्यातली विकासकामे थांबणार नाहीत. विकासाची प्रक्रिया अखंड, निरंतर सुरु राहील याची संपूर्ण काळजी घेण्यात आली. रस्ते, रेल्वे, मेट्रो, कोस्टलरोड, उड्डाणपूलांसारख्या पायाभूत प्रकल्पाची कामे गतीमान करण्यात आली. पायाभूत प्रकल्प निर्मितीबरोबरंच नागरिकांचं रोजचं जगणं सुसह्य होईल यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. धोरणं आखून अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी बांधिल असल्याचा पुनरुच्चार केला. शेतकरी कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज, आमदार स्थानिक निधीत वाढ, आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत, आरोग्य सेवेचे सक्षमीकरण, शिवभोजन थाळी, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक बांधवांच्या विकासासाठी भरीव निधी अशा अनेक निर्णयांची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे.