येवला बाजारात आल्या दोन्ही बाजूने नेसता येणा-या पैठणी; नववर्षात साड्यांमध्ये केला मोठा बदल

दोन्ही बाजूने नेसता येणारी ही पैठणी दोन रंगांची असल्याने महिलांना एकाच पैठणीमध्ये दोन पैठण्यांचा आनंद घेता येणार आहे.

Paithani Representative Image (Photo Credits: Instagram)

महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचे पारंपारिक वस्त्र समजल्या जाणा-या पैठणीमध्ये (Paithani) एक मोठा बदल करण्यात आला आहे. पैठणीसाठी प्रसिद्ध समजल्या जाणा-या येवल्यातील बाजारात एक नवीन पद्धतीची पैठणी आली आहे. ही पैठणी साधीसुधी नसून त्यात एक अनोखा बदल करण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे साडी ही सर्वसाधारणपणे एकाच बाजूने नेसता येते. कारण त्याच्या उलट्या बाजूस त्यावर केलेले नक्षीकामाचा उरलेला भाग असतो. टीव्ही 9 मराठीने दिलेल्या बातमीनुसार, आता येवल्यात आलेली ही नवीन पैठणी दोन्ही बाजूंनी नेसता येणार आहे. दोन्ही बाजूने नेसता येणारी ही पैठणी दोन रंगांची असल्याने महिलांना एकाच पैठणीमध्ये दोन पैठण्यांचा आनंद घेता येणार आहे.

सर्वसाधारण पैठणी वा साडी ही एकाच बाजूने परिधान करता येते आणि तिचा रंगही एकच असतो. मात्र दोन्ही बाजूने दोन रंगाची आणि दोन्ही बाजूने महिलांना परिधान करता येईल अशी आगळीवेगळी पैठणी येथील 75 वर्षीय राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त विणकर शांतीलाल भांडगे यांनी बनविली आहे. विशेष म्हणजे पैठणीच्या आजवरच्या वाटचालीतील ही एकमेव पैठणी साकारली आहे. ही पैठणी टू-इन-वन स्वरूपाची आहे.  Wedding Jewellery Ideas: लग्नात नववधूच्या दंडावर खुलून दिसतील बाजूबंदाच्या या हटके डिझाईन्स; एकदा पाहाच

नव्या पैठणीची वैशिष्ट्ये

इतर पैठणीपेक्षा दीड पटीने या पैठणीचे वजन, रेशीम, विणकाम कलाकुसर हे सर्वच घटक अधिक आहे. पैठणीचे साधारणत: वजन 700 ते 800 ग्रॅमच्या आसपास असते. मात्र ही पैठणी दीड किलो वजनाची असून पैठणीचा पदर आकुर्डी डिझाईनमध्ये बारव पंजा पद्धतीने बनवला असून, त्यावरील डिझाइनही पेशवेकाळातील आहे.

महिलांचे सौंदर्य फुलवणारी येवल्याची पैठणी हे महाराष्ट्राचे ‘महावस्त्र’ म्हणून ओळखले जाते. गेल्या 400 वर्षापासून महिलांना येथील पैठणीने भुरळ घातली आहे. या पैठणीने अनेक रूपे धारण केली असून तिचे वर्षागणिक अनेक प्रकारची रूपं आणि रंगसंगती बाजारात विणकारांनी आणली. परंतु एकच पैठणी दोन्ही बाजूने परिधान करता येईल असा प्रयत्न यापूर्वी कधीही यशस्वी झाला नव्हता. तो नव्या वर्षात ग्राहकांना म्हणजे महिला वर्गाला प्रथमच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महिला वर्गाकडून या पैठणीचे स्वागतच केले जाईल हे वेगळं सांगायची गरज नाही.