Tulsi Lake Overflow: मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो (Watch Video)
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी ‘तुळशी तलाव’ हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
Tulsi Lake Overflow: मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. सातही धरण क्षेत्रात कोसळणाऱ्या जोरदार सरींनी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. तलावर क्षेत्रामध्ये सध्या पावसाचे धुमशान सुरू आहे. गेल्या काही तासांपासून न थांबता सुरू असलेल्या पावसामुळे तुळशी तलाव ओसांडून वाहत आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारा आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात असणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणारा तुळशी तलाव शनिवारी सकाळी साडे आठ वाजता पूर्ण भरून वाहू लागला आहे. (हेही वाचा:Mumbai Grant Road Building Collapse: ग्रँड रोड परिसरात चार मजली इमारतीचा भाग कोसळला; ढिगार्याखाली अनेक जण अडकल्याची भीती, रेस्क्यू ऑपरेशन सुरू )
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी ‘तुळशी तलाव’ हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. (हेही वाचा:Mumbai Rain Update:मुंबईत पावसाची धुवाधार बॅटींग; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद (Watch Video) )
विशेष असं की, गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये 20 जुलैच्या दिवशीच तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला होता. मध्यरात्री दीडच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता. 804.6 कोटी लीटर अर्थात 8046 दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष 2022 व वर्ष 2021 मध्ये 16 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर 2020 मध्ये 27 जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.
तुळशी तलाव बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 35 किलोमीटर अंतरावर आहे. या कृत्रिम तलाव असून त्याचे बांधकाम सन 1879 मध्ये पूर्ण झाले आहे. या तलावाच्या बांधकामासाठी तेव्हा सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च झाला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.76 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 1.35 चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा 804.6 कोटी लीटर एवढा असतो. तुळशी तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहणारे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.