Tuljapur Band: Sambhaji Chhatrapati यांना तुळजापूर मंदिरात गाभार्‍यात प्रवेश नकारल्याच्या निषेधार्थ आज तुळजापूर बंद

दर्शनासाठी संभाजीराजे छत्रपती हे देवीच्या गाभाऱ्यात जात असताना मंदिर प्रशासनाने नियम दाखवत त्यांना रोखले

Tuljapur Mandir ( Photo Credits: tuljabhavanipujari.com)

संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना काही दिवसांपूर्वी तुळजापूर मंदिरामध्ये गभार्‍यात प्रवेश नाकारल्याच्या निषेधार्थ आज तुळजापूर बंद (Tuljapur Band) पाळण्यात आला आहे. या बंदला नागरिकांनीही प्रतिसाद दिला आहे. बंदच्या माध्यमातून मंदिर संस्थानाचा निषेध करण्यात आला आहे.

संभाजी छत्रपती सोमवार 9 मे दिवशी संध्याकाळी कुलस्वामिनी तुळजा भवानीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनासाठी संभाजीराजे छत्रपती हे देवीच्या गाभाऱ्यात जात असताना मंदिर प्रशासनाने नियम दाखवत त्यांना रोखले. यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला. छत्रपती देखील संतापल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये जारी झाला होता. दरम्यान यानंतर छत्रपतींचा अपमान झाल्याने आज तुळजापूर बंद करण्यात आले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाने तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे. नक्की वाचा: Osmanabad: छत्रपती संभाजीराजे भोसले यांना तुळजा भवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले .

संभाजी छत्रपती हे कोल्हापूर संस्थानचे आहेत तसेच ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. नुकताच त्यांचा राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. आता ते कोणतं नवं पाऊल उचलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. नुकतीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचेही आभार मानल्याचे फोटो सोशल मीडीयात आले होते.