Tripura: त्रिपुरातील घटनांबाबत सोशल मीडियावरून पसरवल्या खोट्या बातम्या; कोणत्याही मशिदीचे नुकसान झाले नाही, गृह मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण
अमरावतीमध्ये, त्रिपुरातील अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार थांबवावेत या मागणीसाठी शुक्रवारी 8,000 हून अधिक लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक निवेदन सादर केले
त्रिपुरातील (Tripura) कथित जातीय दंगलीवरून महाराष्ट्रात तणावाचे वातावरण आहे. मुस्लिम संघटनांनी शुक्रवारी राज्यातील अनेक शहरांमध्ये बंद पुकारला होता. यानंतर अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये हिंसाचार उसळला. अमरावतीमध्ये दंगलीचे वातावरण होते. शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. दरम्यान, त्रिपुरा प्रकरणाबाबत गृहमंत्रालयाने निवेदन दिले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यातील एका मशिदीची नासधूस आणि तोडफोड केल्याबद्दल सोशल मीडियावर फिरणारे वृत्त खोटे आहे.
त्रिपुरातील घटनांबाबत सोशल मीडियावरून निराधार बातम्या पसरवल्या जात आहेत. यासाठी गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, त्रिपुरातील मशिदीच्या तोडफोडीबाबत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बातम्या खोट्या आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, ज्याप्रमाणे सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे त्यानुसार त्रिपुरातील या घटनांमध्ये साधी किंवा गंभीर दुखापत, बलात्कार किंवा मृत्यू झाल्याची कोणतीही बातमी नाही.
तसेच त्रिपुरामध्ये कोणत्याही मशिदीच्या संरचनेला नुकसान झाल्याची कोणतीही घटना नोंदवण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकांनी शांत राहावे आणि अशा खोट्या बातम्यांद्वारे दिशाभूल करू नये, असेही म्हटले आहे. यावरून लक्षात येत आहे की, महाराष्ट्रात, त्रिपुराबाबतच्या फक्त खोट्या बातम्यांच्या आधारे हिंसाचार आणि शांतता आणि सौहार्द बिघडवण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह विधाने केल्याचा प्रकार घडला आहे. (हेही वाचा: Amravati Violence: अमरावतीत तीन दिवस इंटरनेट सेवा बंद, अफवा रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाचा निर्णय)
दरम्यान, त्रिपुरातील घटनांच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लिम संघटनांनी काढलेल्या मोर्चांनंतर महाराष्ट्राच्या काही भागात हिंसाचार उसळला आहे. अमरावतीमध्ये, त्रिपुरातील अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार थांबवावेत या मागणीसाठी शुक्रवारी 8,000 हून अधिक लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक निवेदन सादर केले. अमरावती, नांदेड, मालेगाव, वाशीम आणि यवतमाळमध्ये हिंसाचाराची नोंद झाली आहे. अमरावती शहरात शनिवारी इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.