पुणे: हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्यांवर कारवाई; लाखोंचा दंड वसूल

मात्र पुणेकरांनी या निर्णयाला विरोध केला.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

1 जानेवारी 2019 पासून पुण्यात हेल्मेटसक्ती लागू झाली. मात्र पुणेकरांनी या निर्णयाला विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी विरोध करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरु केली आहे. नियम लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी हेल्मेट (Helmet) शिवाय गाडी चालवणाऱ्या तब्बल 7 हजार 490 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून पुणे पोलिसांनी तीन लाखांपेक्षा अधिक  दंड वसूल केला आहे. तसंच ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी (Pune Police) दिली आहे.

हेल्मेटसक्तीच्या निर्णयाला पुण्यातील विविध संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला. या विरोधात पुणेकर 3 जानेवारीला विनाहेल्मेट दुचाकी रॅली देखील काढणार आहेत. पत्रकार संघ ते पुणे आयुक्तालय या दरम्यान ही रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीनंतर पुणे पोलिस आयुक्त के वेंकटेशम यांच्यासमोर हेल्मेटसक्तीपासून मुक्ती मिळावी म्हणून निवदेन सादर केले जाणार आहे.

रॅली काढून विरोध करण्याचा निर्णय हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हेल्मेट वापरण्याला विरोध नसून, सक्तीला विरोध असल्याचं हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच मत आहे. पुणेकरांची हेल्मेटसक्तीपासून मुक्तता व्हावी, अशी मागणी कृती समितीने केली आहे.

हेल्मेटसक्तीचा निर्णय हा सुरक्षिततेच्या दृष्टीने घेण्यात आला असला तरी मात्र याला पुणेकरांकडून विरोध होत आहे.