पुणे: दुकानांच्या वेळेच्या निर्बंधावरुन व्यापारी महासंघ आक्रमक; 3 ऑगस्ट रोजी करणार घंटानाद आंदोलन

आंदोलनानंतरही सरकारने ऐकले नाही तर दुपारी 4 नंतरही दुकानं सुरु ठेवणार असल्याचं व्यापारी महासंघाने म्हटलं आहे.

Traders Association (Photo Credits: Twitter)

पुणे (Pune) व्यापारी महासंघाकडून (Traders Association) मंगळवार, 3 ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शहारातील विविध ठिकाणी दुपारी 12 ते 12:15  वाजेपर्यंत घंटानाद आंंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनानंतरही सरकारने निर्बंध हटवले नाहीत तर दुपारी 4 नंतरही दुकानं सुरु ठेवणार असल्याचं व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हटलं आहे. आयोजित पत्रकार परिषदेत व्यापारी महामंघाने आपल्या मागण्या मांडल्या. तसंच कोविड-19 लॉकडाऊनमध्ये सर्व नियम पाळूनही रुग्णसंख्या कमी होत असताना व्यापाऱ्यांवरच निर्बंध का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दुकानं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, अन्यथा व्यापारी परस्पर दुकानं खुली करतील, असं महासंघाने सांगितलं. अशावेळी नियामांचं उल्लंघन केल्याने व्यापाऱ्यांना अटक झाली तरी चालेल पण आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. (Pune Covid-19 Restrictions: पुण्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार? दिलीप वळसे पाटील यांचे संकेत)

लॉकडाऊनमुळे मागील वर्षीही व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 16 व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली.  यावर्षीही मागील 4 महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. अजून किती आत्महत्या होईपर्यंत सरकार वाट पाहणार आहे, असा सवालही रांका यांनी उपस्थित केला. या मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी वारंवार चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे ते नेहमी सांगतात. अशावेळी आम्ही काय करायचं, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

निर्बंधांमुळे केवळ व्यापाऱ्यांचाच नाही तर त्यांच्याकडे काम करणाऱ्या सुमारे 1 लाख कर्मचाऱ्यांच्या पोटापाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दुकानं बंद असल्याने कामगारांना पगार देणं व्यापाऱ्यांना कठीण होत आहे, असेही ते म्हणाले. तसंच कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घेण्यासही आम्ही तयार आहोत. लस विकत घेण्याची सरकारने परवानगी द्यावी, असेही महासंघाने म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif