Tomato Stolen in Maharashtra: पुण्यात शेतकऱ्याच्या घराबाहेरून 400 किलो टोमॅटो चोरीला; गुन्हा दाखल, तपास सुरु

त्यानंतर ताबडतोब ढोमे यांनी शिरूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.

Tomato | representative pic- (photo credit -pixabay)

टोमॅटोचे (Tomato) भाव सध्या गगनाला भिडले आहेत. यामुळे लोकांच्या जेवणातील टोमॅटोचे प्रमाणही कमी झाले आहे. नुकतेच मध्य प्रदेशमध्ये टोमॅटोमुळे एक पत्नी आपल्या पतीला सोडून गेली होती. आता महाराष्ट्रातील पुण्यात (Pune) एका शेतकऱ्याने टोमॅटो चोरीची तक्रार दाखल केली आहे. तब्बल 400 किलो टोमॅटो चोरीला गेल्याची फिर्याद शेतकऱ्याने पोलिसांत दिली आहे. गेल्या आठवडाभरात देशभरात टोमॅटोचे भाव प्रचंड वाढल्यानंतर अशी टोमॅटो चोरीचे प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.

पुण्यातील या शेतकऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हणतले आहे की, या चोरीमुळे त्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. फिर्यादी अरुण ढोमे यांनी पोलिसांना सांगितले की, रविवारी शेतातून टोमॅटो तोडल्यानंतर मजुरांच्या मदतीने ते शिरूर तहसील येथील त्यांच्या घरी आणले होते. हे टोमॅटो बाजारात विकण्याचा त्यांचा विचार होता, त्यापूर्वी कोणीतरी टोमॅटोचे बॉक्स चोरून नेल्याचे ढोमे यांनी सांगितले.

अरुण ढोमे यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी उठल्यावर त्यांना 400 किलो वजनाच्या टोमॅटोच्या 20 पेट्या गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर ताबडतोब ढोमे यांनी शिरूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Vegetables Rates: पावसामुळं भाजीपाला पिकांचं दर वाढणार, टोमॅटोप्रमाणेच या भाज्यादेखील महाग)

दरम्यान, महागाईमुळे टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा फायदा घेत आणखी एका शेतकऱ्याने नुकतेच पुणे जिल्ह्यात 18,000 क्रेट टोमॅटो विकून सुमारे 3 कोटी रुपये कमावले. अनेक राज्यांमध्ये टोमॅटो 100 ते 200 रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे टोमॅटोचे लाखो रुपयांचे पीक झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणेही शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे.