Tomato Price Hike: हंगामी बदलामुळे टोमॅटोचे भाव गगनाला भिडले; कधी मिळणार दिलासा? जाणून घ्या

बंगळुरू, हैदराबाद, पंढरपूर, नाशिक, पुणे, तामिळनाडू आणि नागपूरच्या बाजारपेठेतून टोमॅटो विदर्भाच्या बाजारपेठेत पोहोचतो. गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भातील किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.

Tomato ( Image Credit -Pixabay)

Tomato Price Hike: राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशात टोमॅटोच्या दरामध्ये (Tomato Price) मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. दिल्लीत एक किलो टोमॅटो 120 रुपयांपर्यंत विकले जात आहेत. केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी टोमॅटोच्या किमती वाढण्याबाबत मोठं विधान केलं आहे. टोमॅटोचे भाव वाढण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे. रोहित कुमार सिंग यांनी सांगितलं आहे की, टोमॅटोच्या किमतीत हंगामी तफावत असते, कारण त्याची उत्पादन वेळ प्रत्येक प्रदेशानुसार बदलत असते. त्यामुळे दरवर्षी किमती या वेळी किंचित जास्त असतात. हिमाचल प्रदेशातील सिरमौर आणि सोलन येथून टोमॅटो बाजारात येण्यास सुरुवात झाली की दिल्लीतील भाव कमी होतील.

दरम्यान, महाराष्ट्रातील नागपूर आणि परिसरातील किरकोळ बाजारात टोमॅटो 100 ते 120 रुपये किलोने विकला जात आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो 120 रुपये किलोने विकला जात आहे. मंडईत टोमॅटोची आवक कमी असून हीच स्थिती आणखी दोन ते तीन महिने राहणार असल्याचे टोमॅटो विक्रेत्यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - Financial Changes from July 2023: जुलै महिन्यात तुमच्या बजेटवर होणार परिणाम; ITR ते पेन्शनमध्ये होणार 'हे' मोठे आर्थिक बदल)

उत्पादनाच्या बहुतांश ठिकाणी मालाच्या टंचाईमुळे त्याच्या किमती वाढल्या आहेत. बंगळुरू, हैदराबाद, पंढरपूर, नाशिक, पुणे, तामिळनाडू आणि नागपूरच्या बाजारपेठेतून टोमॅटो विदर्भाच्या बाजारपेठेत पोहोचतो. गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भातील किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. पहिल्याच पावसाने टोमॅटोच्या वाढलेल्या भावामुळे सर्वसामान्यांचा घाम फुटला आहे.

तथापी, हिमाचल प्रदेशातील सोलन येथील भाजी मार्केटमध्ये सध्या टोमॅटोचे दर वाढत आहेत. शुक्रवारी मंडईत टोमॅटो 73.54 रुपये किलो दराने विकला जात आहे. गेल्या काही दिवसांत टोमॅटोच्या दरात किलोमागे सात रुपयांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी सोलन मंडईत टोमॅटोचे केवळ 4000 क्रेट पोहोचले आहेत.