Tiger Death Toll: चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या 10 महिन्यांत 40 हून अधिक वाघांचा मृत्यू; जाणून घ्या कारणे

वाघांची शिकार करून, त्यांचे भाग कापून विकले जातात. म्हणूनच संपूर्ण राज्यात शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे झाले आहे.

Tiger प्रतिकात्मक फोटो (PC - Pixabay)

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जंगले आणि वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. वनविभागाच्या प्रयत्नांमुळे राज्यात वाघांची (Tigers) संख्या वाढली आहे. मात्र दुसरीकडे, या वाघांकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या 10 महिन्यांत राज्यात 40 वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक महिन्याच्या शावकांपासून प्रौढ वाघ आणि बिबट्यापर्यंतच्या प्राण्यांचा समावेश आहे.

सध्या मानव आणि वन्यजीव यांच्यातील वाढता संघर्ष कमी करणे कठीण होत चालले आहे. शहराला लागून मोठे वनक्षेत्र आहे. यामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, पवनी-उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात आदींचा समावेश असून त्यामुळे वन्य प्राण्यांची संख्या वाढली आहे.

मात्र गेल्या काही दशकांमध्ये वनक्षेत्र कमी झाल्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून जनावरे व पिके वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या विद्युत शॉकमुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू होतो. शिकाऱ्यांच्याकडूनही प्राण्यांचा मृत्यू होतो, तसेच अपघातात वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. गडचिरोली वनविभागात वाघाची शिकार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या (MTR) बफर झोनमधील परतवाडा विभागातील सुसरडा रेंजमध्ये गुरुवारी आणखी एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. (हेही वाचा: Mumbai Crime News: वडाळ्यात सापडला अर्ध जळलेला महिलेचा मृतदेह, गुन्हा दाखल)

या दोन घटनांमुळे राज्यात गेल्या 10 महिन्यांत वाघांच्या मृत्यूची संख्या 42 वर पोहोचली आहे. वाघांची शिकार करून, त्यांचे भाग कापून विकले जातात. म्हणूनच संपूर्ण राज्यात शिकार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे झाले आहे. गडचिरोलीतील चातगाव वनपरिक्षेत्रातील अमीरगा परिसरात जिवंत विद्युत तारेला स्पर्श करून वाघाची शिकार झाल्याची घटना नुकतीच घडली. घटनास्थळी सापडलेल्या मृत वाघाचे डोके व पंजे गायब होते. यासह वनविभागाचे कर्मचारी वनक्षेत्रात सतत गस्त घालत असले तरी, नियमित गस्त होत नसल्याने शिकारी वनक्षेत्रात घुसून वन्यप्राण्यांची शिकार करत आहेत. यावर आळा बसणे गरजेचे आहे.