महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: भाजप पक्षाला मोठा धक्का; देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 'हे' 6 दिग्गज मंत्री सध्या पिछाडीवर
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 6 दिग्गज मंत्री हे मतमोजणीच्या प्रक्रियेत पिछाडीवर असल्याची धक्कादाय बातमी सध्या समोर येत आहे.
आज संपूर्ण राज्याचं लक्ष हे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांकडे लागलं आहे. एक्सिट पोलने दर्शवल्यानुसार भाजप पक्षाला घवघवीत यश मिळणार असल्याचे दिसून आले. परंतु सध्या समोर असलेली आकडेवारी पाहता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारसाठी मात्र धक्क्याचे संकेत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 6 दिग्गज मंत्री हे मतमोजणीच्या प्रक्रियेत पिछाडीवर असल्याची धक्कादाय बातमी सध्या समोर येत आहे. यात पंकजा मुंडे, राम शिंदे, मदन येरावार, अतुल सावे, भाळा भेगडे, अनिल बोंडे आणि रवींद्र चव्हाण या बड्या मंत्र्यांच्या समावेश आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत होती. परंतु पंकजा मुंडे पिछाडीवर असून धनंजय मुंडे हे बाजी मारताना दिसत आहेत. त्याचसोबत कर्जत- जामखेड मतदार संघातून भाजपचे राम शिंदे यांच्याविरुद्ध रोहित पवार अशी लढत होती पण राम शिंदे यांना पिछाडीवर टाकत रोहित पवार यांनी आघाडी घेतली आहे.
पंकजा मुंडे सध्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तर राम शिंदे यांच्याकडे अनेक खाती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यांना राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री बनवले होते तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही देण्यात आले होते.