Mumbai: सध्या रुग्णालयात COVID-19 चा कोणतीही संशयास्पद किंवा सिद्ध रुग्ण नाही; पी. डी. हिंदुजा रुग्णालय आणि एमआरसीने दिली माहिती
या विषाणूमुळे एकट्या चीनमध्ये 3 हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. संशोधक यावर लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहे
चीनमधील वुहान येथून बाहेर पडलेल्या कोरोना विषाणूची (Coronavirus) सर्वांनीच धास्ती घेतली आहे. या विषाणूमुळे एकट्या चीनमध्ये 3 हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. संशोधक यावर लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, देशातील सरकार सर्वांना सतर्क राहण्याचा इशार देत आपल्यापरीने त्यावर उपाययोजना करीत आहे. अशात भारतात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार सतर्क झाले आहे. सध्या या विषाणूबाबत मुंबई (Mumbai) येथे चार जण कस्तुरबा आणि हिंदुजा रुग्णालयात (P. D. Hinduja Hospital) दाखल आहेत. मात्र अजूनतरी या विषाणूची लागण झालेला रुग्ण हिंदुजामध्ये नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या रुग्णालयात कोविड-19 रूग्णाची कोणतीही संशयास्पद किंवा सिद्ध झालेली घटना घडली नाही. कोरोनाव्हायरस विरूद्ध खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आवश्यक कार्यवाही करीत आहे. केंद्र शासनाच्या वतीने कोरोना विषाणूबाबत डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत असून, 6 मार्चला त्याचे पहिले सत्र दिल्ली येथे होत आहे. राज्यात या विषाणूशी लढण्यासाठी पर्सनल प्रोटेक्शन कीट, एन-95 मास्क, ट्रीपल लेअर मास्क ही आवश्यक साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करु नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन)
दरम्यान, मुंबई महानगपालीका व महाराष्ट्र शासनाने याबाबत 24X7 हेल्पलाईन क्रमांक सुरु केले आहेत. बीएमसीने मुंबई शहरातील कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदवण्यासाठी 1916 हा नंबर सुरु केला आहे. तर महाराष्ट्र सरकारने खास कोरोना व्हायरससाठी हेल्पलाईन क्रमांक '020-26127394' सुरू केला आहे. कोरोना व्हायरसबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद काल पार पडली. त्यामध्ये त्यांनी, 'राज्यातील लोकांना कोरोना व्हायरसच्या परिस्थितीबाबत घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र जनतेने आता सतर्क असले पाहिजे कारण पुढचे आठ दिवस फार महत्वाचे आहेत.' असे सांगितले.