Mumbai: पत्नी जायची जिमला, नवऱ्याला आला भलताच संशय; जिम ट्रेनरवर अॅसिड हल्ला करून झाला फरार

ही घटना विरारमध्ये (Virar) घडली आहे. या विचित्र घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Image For Representation (Photo Credit: Pixabay)

पत्नी जात असलेल्या जीममधील ट्रेनरवर पतीने अॅसिड हल्ला (Acid Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना विरारमध्ये (Virar) घडली आहे. या विचित्र घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. संबंधित महिलेचे तिच्या जिममधील ट्रेनरसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय तिच्या पतीला होता. याच संशयातून पतीने थेट जीम ट्रेनरवर अॅसिड हल्ला केला आहे, अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जीम ट्रेनर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

हरिशचंद्र चौधरी असे आरोपीचे नाव आहे. हरिशचंद्र हा विरार पूर्वेकडील आरजे नगर येथील रहिवासी आहे. दरम्यान, याच परिसरात असलेल्या स्वेट बॉक्स या जिममध्ये त्याची पत्नी व्यायाम करायला जात होती. परंतु, आपल्या पत्नीचे जिममधील ट्रेनर रितेश कदम याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय हरिशचंद्रला आला होता. यावरून हरिशचंद्र आणि त्याच्या पत्नीत वादही झाला होता. याच वादातून हरिशचंद्रने रितेशवर अॅसिड हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात रितेश गंभीर जखमी झाला असून मुंबईतल्या केएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या संदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा-पुण्यात सलग दुस-यांदा मास्क न घातलेला आढळलेल्या व्यक्तीस भरावा लागणार 1000 रुपयांचा दंड- जिल्हाधिकारी राजेश देशमुख

या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी हरिशचंद्रविरोधात हत्येच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिशचंद्र सध्या फरार असल्याचे समजत आहे. तसेच पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.