सुरु झाली Covid-19 ची तिसरी लाट, जानेवारी-अखेरपर्यंत पोहोचेल पीकवर; मंत्री Rajesh Tope यांची माहिती
दरम्यान, केंद्राने सोमवारी सांगितले की, भारतात कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेदरम्यान रूग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या आजाराची तिसरी लाट सुरू झाली असून ती जानेवारी अखेरपर्यंत तिच्या पीकपर्यंत पोहोचेल, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले. यावेळी त्यांनी 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी निम्मा म्हणजे सात दिवसांवर आणला असल्याचेही सांगितले. त्यांनी लोकांना कोविड-योग्य वर्तनाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातील कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होऊनही अनेक राजकीय नेते साथीच्या रोगाच्या प्रोटोकॉलचे पालन करत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
सध्याच्या काळात राजकीय पक्षांनी सभा आणि कार्यक्रम आयोजित करू नयेत, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले. 'जान है तो जहाँ है' ही उर्दू म्हण उद्धृत करून टोपे म्हणाले की, प्रत्येकाने सुरक्षित राहणे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, ‘प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे, मुलांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी शाळा बंद केल्या गेल्या आहेत. सरकारने जाहीर केलेल्या निर्बंधांना लोकांनी पाठिंबा द्यायला हवा.’
सोमवारी साथीच्या परिस्थितीबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी व्हर्च्युअल बैठक पार पडली असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत, साथीच्या रोगाची तयारी आणि प्रतिबंध यासाठी इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स प्लॅन्स अंतर्गत निधीचा वापर यावर चर्चा करण्यात आली. तसेच ऑक्सिजन प्लांटची दुरुस्ती करणे आणि बूस्टर डोसचे प्रशासन जलद करणे, 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण यावरही चर्चा करण्यात आली. (हेही वाचा: Maharashtra Online Education: कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद, लवकरच सुरु होणार ऑनलाइन शिक्षण; मंत्री वर्षा गायकवाड यांचे निर्देश)
राजेश टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील एकूण 17,000 ऑक्सिजनयुक्त बेडपैकी फक्त चार टक्के बेड्स सध्या व्यापलेले आहेत. दरम्यान, केंद्राने सोमवारी सांगितले की, भारतात कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेदरम्यान रूग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यासोबतच सरकारने म्हटले आहे की, परिस्थिती झपाट्याने बदलत आहे आणि त्यामुळेच रुग्णालयाची गरजही वाढू शकते. अधिकृत आकडेवारीनुसार, दुसऱ्या लाटेच्या वेळी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण 20-23 टक्क्यांच्या दरम्यान होते.