राज्यात काल एका दिवसात 5 हजार 434 ग्राहकांना घरपोच मद्य विक्री; नागपूर व लातूर येथील ग्राहकांनी मागवली सर्वात जास्त दारू
सरकारने काही ठिकाणी व्यवसाय, दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे सुरु झालेले लॉक डाऊन (Lockdown) सध्या काही प्रमाणत शिथिल करण्यात आले आहे. सरकारने काही ठिकाणी व्यवसाय, दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. अशात एक मोठा निर्णय घेत सरकारने दारूची घरपोच सेवा (Liquor Home Delivery) सुरु केली. राज्यात काल सकाळी 10 वाजल्यापासून घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी दिवसभरात तब्बल 5 हजार 434 ग्राहकांना घरपोच मद्य विक्री करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर आणि लातूर येथील ग्राहक आघाडीवर असून, या ठिकाणी 4 हजार 875 ग्राहक असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनमध्ये 15 मेपासून महाराष्ट्र सरकारने मद्यपान करणार्यांना दिलासा देत, दारूची घरपोच डिलिव्हरी सुरु केली. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही अटी घातल्या आहेत. महत्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी दारूच्या दुकानांना परवानगी होती फक्त अशाच ठिकाणी दारूची होम डिलिव्हरी केली जाणार आहे. मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात (3 कोरडे जिल्हे- गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर वगळता) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त परवाने असलेले दारूची दुकाने सुरु आहेत. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ परवाना असलेल्या मद्य विक्री दुकानांपैकी, 4 हजार 597 दुकाने सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
राज्यात 24 मार्च, 2020 पासून लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून, 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. दि.14 मे, 2020 रोजी राज्यात 84 गुन्हे नोंदविण्यात आले असून, 45 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यांच्याकडून 22 लाख 62 हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.