Health Department Recruitment Process: आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत होणार पूर्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले निर्देश

सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीच्या प्रक्रियेला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी विभागातील पदभरती जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले

Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीच्या प्रक्रियेला (Health Department Recruitment Process) गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी विभागातील पदभरती जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले. यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी, सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी, आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा, दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी अशा सूचनाही दिल्या.

या वर्षात नागरिकांसह आरोग्य यंत्रणा कोरोनाशी यशस्वी लढा देत आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी त्यासाठीचे नियम पाळणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावो अशा शुभेच्छा आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आरोग्यमंत्र्यांनी ही बैठक घेत यंत्रणेला अधिक सक्षमपणे आणि सेवेचा दर्जा उंचावण्याचे आवाहन केले. (हेही वाचा: महाराष्ट्र: जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडेही लक्ष द्यावे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आरोग्य केंद्रांना सूचना)

आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि गावातील मुख्य चौकात माहितीचे मोठे फलक लावण्यात यावेत, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिद्धी करावी असेही त्यांनी सांगितले. दिव्यांगांना प्रमाणपत्र देताना त्याची प्रक्रिया अधिक सुलभ करावी. हे प्रमाणपत्र शक्य झाल्यास ग्रामीण रुग्णालय आणि उप जिल्हा रुग्णालय स्तरावर देण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला दिले.

राज्यातील आरोग्य संस्थांचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जात असून जिल्हा यंत्रणेने सार्वजनिक आरोग्य संस्थेतील स्वच्छता, परिसर स्वच्छता, भोजनाचा दर्जा याकडे विशेष लक्ष देऊन सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा चेहरा बदलण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement