IPL Auction 2025 Live

Maharashtra Assembly Elections 2019: सध्याच्या सरकारवर भ्रष्ट्राचाराचा डाग नाही; मुंबईच्या महायुतीच्या सभेत पीएम नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीसांचे कौतुक

व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांनी पुन्हा आपले सरकार आणूया म्हणत 24 ऑक्टोबरला राज्यात महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास दर्शवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit-PTI)

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. प्रत्येक पक्षाने प्रचाराचा जोरदार तडाखा लावला आहे. महाराष्ट्रात प्रचारासाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी आपापले स्टार उमेदवार उतरवले आहेत. आज मुंबईच्या बांद्रा-कुर्ला संकुल (BKC) येथे महायुतीची मोठी सभा पार पडली. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उपस्थित होते. व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांनी पुन्हा आपले सरकार आणूया म्हणत 24 ऑक्टोबरला राज्यात महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास दर्शवला.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. मुंबईकरांचा पाठींबा आम्हालाच मिळणार अशी आशा व्यक्त करत सत्तेची हाव असणारी कॉंग्रेसला आता थकली आहे, त्यामुळे आमच्यासमोर कोणताही विरोधक नाही असा टोला लगावला. या महिन्यात दोन विजयादशमी असतील या आपल्या वक्यव्याचा उल्लेख करत त्यांनी राम मंदिर मुद्द्याला हात घातला. लवकरच अयोध्येतील राम मंदिराचा निर्णय येईल तो दिवस विजयादशमी असेल. असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या जाहीरनाम्यातील सावरकर आणि ज्योतिबा फुले यांना भारतरत्न देणार या वचनावर भर देत आपण ही मागणी जोर धरून लावणार असे सांगितले. त्यानंतर त्यांनी मोदी आणि शिवसेनेने केलेल्या कामाचा पाढा वाचला. (हेही वाचा: कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देणं हा सत्तेचा माज; राज ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र)

नरेंद मोदींनी आपल्या भाषणात भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, 'पाच वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री दिला आहे. याआधी कोणालाही ही संधी मिळाली नाही. मुंबई आर्थिक राजधानी असल्याने इथे परदेशी गुंतवणूक शक्य आहे, आता त्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. पूर्वीच्या सरकारसारखे सध्याच्या सरकारवर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत हे महायुतीचे यश आहे. महायुतीच्या काळात फडणवीस यांनी अनेक विकासकामे केली.जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे.' मोदींनी आपल्या भाषणात पूर्वीचे सरकार आणि सध्याचे सरकार यांमधील दरक दाखवून दिला. सध्याच्या सरकारद्वारे सुरु केलेल्या योजना, करामधील फरक, जनतेला मिळालेल्या सोयी सुविधा, मेट्रो, घरे यांचे गुणगान गाण्यावर त्यांचा भर होता.

दरम्यान सध्या कार्यरत असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली. उद्या सर्व पक्षांचा प्रचार थांबणार आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.