'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यामधील नगरसेवकांना 1 कोटी देण्याचे आमिष'- राष्ट्रवादी नेते Jitendra Awhad

ठाण्यातील एका राजकीय जाणकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आगामी टीएमसी निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी कळवा आणि मुंब्र्यातील राष्ट्रवादीचे प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र आव्हाड यांना पराभूत करण्यासाठी रणनीती आखत आहेत.’

Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटरवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटावर गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना (BSS) कळवा आणि मुंब्रा येथील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना 1 कोटी रुपयांचे आमिष दाखवत असल्याचे ट्विट माजी मंत्र्यांनी शुक्रवारी केले. माजी गृहनिर्माण मंत्र्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाण्यातील एका राजकीय जाणकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘आगामी टीएमसी निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी कळवा आणि मुंब्र्यातील राष्ट्रवादीचे प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र आव्हाड यांना पराभूत करण्यासाठी रणनीती आखत आहेत.’

तसेच मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे काही नगरसेवक बंडखोरीच्या तयारीत असून त्यांना शिंदे गटाचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे एकनिष्ठ समजले जाणारे राष्ट्रवादीचे प्रभावी नेते हणमंत जगदाळे हे त्यांच्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करण्याचा विचार करत असल्याचीही माहिती मिळाली आहे.

आता आव्हाड यांनी ट्विटरवरून शिंदे गटावर गंभीर आरोप केले असून, त्यांनी म्हटले आहे की- ‘पैशवाल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून कळवा-मुंब्र्यामधील नगरसेवकांना खुलेआम तुला 1 कोटी देतो तुझ्या पत्नीला 1 कोटी देतो अशाप्रकारे आमिष दाखविणे सुरु झाले आहे. तसेच नगरसेवक असेल तर तुला तिकीट देतो आणि आता तुला 10 कोटी रुपयांची कामे. ही आहे राष्ट्रवादी फोडण्याची पद्धत.’ या ट्वीटबाबत बाळासाहेबांची शिवसेनागटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (हेही वाचा: Sanjay Raut Statement: मोदी सरकार वीर सावरकर आणि बाळासाहेबांना विसरले, संजय राऊतांचे वक्तव्य)

दरम्यान, नुकतेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्याचा दौरा केला. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्याला भेट दिली. या भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ‘प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी काम करण्याचा अधिकार आहे’.