IPL Auction 2025 Live

The Kashmir Files: अमरावतीमध्ये 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट पाहिल्यानंतर दोन गटात हाणामारी; 15 जणांना अटक, परिसरात तणाव

अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ म्हणाले की, प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन आम्ही अचलपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे

The Kashmir Files (Photo Credit - YouTube)

'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरून सुरू झालेला वाद आता रस्त्यावर आला आहे. महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये (Amravati) चित्रपट पाहून परतणाऱ्या तरुणांवर दुसऱ्या गटाने हल्ला केला. यामध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांनी 15 जणांना अटक केली असून, याबाबत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू आहे. रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास परतवाडा भागातील रेड पूल परिसरात मारहाणीची घटना घडली, मात्र मंगळवारी सकाळी याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट पाहून परतताना आझादनगर भागातील रेड पूलजवळ काही तरुणांनी जय श्री रामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याच परिसरातील आझाद नगरमध्ये राहणाऱ्या तरुणांच्या दुसऱ्या गटाने याचा विरोध केला. याविरोधात इतर गटांनीही घोषणाबाजी सुरू केल्याने हा वाद हाणामारीपर्यंत गेला. मारामारीनंतर दोन्ही गटांनी तेथून पळ काढला. त्यानंतर 24 तासांत शांतता भंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 15 जणांना अटक केली. अटक करण्याची कारवाई आजही सुरू आहे. यामध्ये आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

सर्व आरोपींना अचलपूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ म्हणाले की, प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन आम्ही अचलपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या निरीक्षण केले जात असून तणाव वाढल्यास आवश्यक ती पावले उचलली जातील. (हेही वाचा: 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर शरद पवारांची प्रतिक्रिया, समाजात फूट पाडणारे लेखन किंवा चित्रपट टाळावेत)

दरम्यान, द काश्मीर फाइल्स या चित्रपटाबाबत विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे, अनेक लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत तर, दुसरीकडे जवळपास 9 राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत काश्मिरी पंडितांच्या पलायन विरोधात आवाज उठवला.