Coronavirus: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 210 नवीन रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर

दुर्दैवाने दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope)

Coronavirus in India (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संक्रमणाच्या बाबतीत सध्या महाराष्ट्र (Maharashtra) अव्वल आहे. दुर्दैवाने दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. अशा प्रकारे एकूण रुग्ण संख्या 1574 झाली आहे. तर कोरोनाबाधित 188 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6039 होती. यामध्ये 206 जणांचा मृत्यू झाला असून, 515 लोक ठीक झाले आहेत.

आज राज्यात 210 नवीन रुग्णांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी मुंबईचे 10 तर पुणे, पनवेल आणि वसई विरार येथील प्रत्येकी 1 आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 9 पुरुष तर 4 महिला आहेत. आज झालेल्या 13 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत. 5 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत, तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 11 रुग्णांमध्ये (85 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. (हेही वाचा: Coronavirus: मुंबईत 212 जणांना कोरोनाची लागण झाल्याने आकडा 993 वर पोहचला, महापालिकेची माहिती)

कोरोना व्हायरसमुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 110 झाली आहे. राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई व्यतिरिक्त पुण्यात 38, मिरा-भाईंदर 17, नागपूर 6, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि बुलडाणा मध्ये प्रत्येकी 2, पिंपरी-चिंचवड आणि अकोला येथे तीन आणि वसई-विरारमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. विभागाने सांगितले की मुंबईत दाखल केलेला एक रुग्ण बाहेरील राज्यातील आहे.