Thane Water Cut: ठाणे महानगर पालिकेकडून 5 जून पासून 10% पाणी कपात जाहीर
ठाण्यात पाणीकपात किसान नगर, बाळकुम पाडा, पाचपाखाडी, मध्ये 10% तर लुईसवाडी मध्ये 5% पाणीकपात आहे.
ठाणे महानगर पालिकेकडून 5 जून पासून 10% पाणी कपातीची घोषणा केली आहे. बीएमसीकडून त्यांना पाणी मिळणार्या भागात ही पाणी कपात लागू करण्याचा निर्णय झाला आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात जलसाठ्यामध्ये पाण्याचं बाष्पीभवन देखील मोठ्या प्रमाणात झाले परिणामी जलसाठ्यात पुरेसा पाणी साठा उपलब्ध नाही त्यामुळे अखेर पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पाणीकपात किसान नगर, बाळकुम पाडा, पाचपाखाडी, मध्ये 10% तर लुईसवाडी मध्ये 5% पाणीकपात आहे. ठाणे, जे बीएमसीकडून 85 एमएलडीसह विविध स्त्रोतांकडून दररोज 590 दशलक्ष लिटर (एमएलडी) खरेदी करते, त्यांनी रहिवाशांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई मध्येही जलसाठा सध्या 10% पेक्षा कमी झाल्याने बीएमसीने 30 मे पासून 5% पाणी कपात जाहीर केली आहे तर स्थिती न सुधारल्यास हीच पाणी कपात जून महिन्यात वाढण्याची शक्यता आहे. पालिकेकडून पश्चिम नगरातील काही भागांमध्ये नवीन पाईपलाईनचं काम करण्यासाठी देखील 29-30 मे दिवशी 16 तास पाणी कपात जाहीर केली होती.
सध्या पाणी कपातीच्या काळात नागरिकांनी सावधपणे पाणी वापरण्याचे आवाहन पालिकांकडून वारंवार केले जात आहे. 30 मे दिवशी शहरातील पाण्याचा साठा 1.21 लाख मिलियन लीटर वर आला आहे. हा केवळ 8.39% साठा आहे. मागील वर्षी याच दिवशी पाण्याचा साठा 1.88 लाख मिलियन लीटर होता जो 13% होता. तर 2022 मध्ये 18.21% पाणीसाठा उपलब्ध होता.
सध्या सार्यांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. पण जलसाठ्यामध्ये समाधानकारक पाऊस पडून पाणी पातळी सुधारत नाही तोपर्यंत नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान 2021,2022 मध्ये पाऊस 15 ऑक्टोबर पर्यंत होता पण मागील वर्षि त्याने लवकर माघार घेतली आणि 2024 मध्ये त्यामुळे 5.64% पाणी कमी जमा झाले होते.