ठाणे: रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटून सहप्रवाशांच्या मदतीने चालत्या रिक्षातून फेकले, पीडित तरुणाची प्रकृती चिंताजनक
त्यानंतर त्याला चालत्या रिक्षातून रस्त्यावर फेकून दिले. मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, यात हा प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत जात असताना ठाण्यातील घोडबंदर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. चोरीच्या उद्देशाने आलेल्या रिक्षाचालकाने आपल्या रिक्षातील इतर 3 प्रवाशांच्या मदतीने पीडिताला लुटून त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला चालत्या रिक्षातून रस्त्यावर फेकून दिले. मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, यात हा प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला जवळच्या वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पंगमायुंग रैखान असे या पीडित प्रवाशाचे नाव आहे.
रैखान याने रविवारी रात्री 12.30 वाजता घरी जाण्यासाठी ठाण्यातील प्रितम ग्लोबल क्यूशन येथून रिक्षा पकडली. तेथून त्याचे घर 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. जेव्हा त्याने रिक्षा पकडली तेव्हा त्यात आधीच 3 प्रवासी बसले होते. काही वेळाने रिक्षाचालकाने मध्येच रिक्षा थांबवून मी लघुशंकेस जातो असे सांगून रिक्षातून उतरला. त्यासोबत त्या रिक्षामधील इतर 3 सहप्रवासीही उतरले. रैखान मात्र रिक्षातच होता. काही वेळाने ते चौघे परत आले. आणि त्यांनी रैखानला लाथाबुक्क्यांनी जोरात मारहाण करण्यास सुरुवात केली. रैखान मदतीसाठी आरडाओरडा करत होता मात्र कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. त्या चौघांनी त्याला बेदम मारहाण करून लुटले आणि चालत्या रिक्षामधून त्याला फेकून देऊन तेथून पळ काढला.
काही वेळानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रैखान वर काही प्रवाशांची नजर गेली. त्यांनी तात्काळ ठाणे पोलिसांना घटनास्थळी बोलावले. ठाणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन रैखानला ताबडतोब जवळच्या वेदांत रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर झालेला जीवघेणा हल्ला हा इतका भीषण होता की त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
हेही वाचा- धक्कादायक! चोरट्यांनी पळवलं बँक ऑफ महाराष्ट्र चं ATM; पुणे - नाशिक महामार्गावर गुंजाळवाडी येथील घटना
मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रैखानला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.