ठाणे: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील संपूर्ण विभाग आज रात्री 12 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहणार
तसेच कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने या ठिकाणी सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे.
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा विखळा अधिक वाढत चालला आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने या ठिकाणी सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात आहे. तर आता ठाणे (Thane) येथे कोविड19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती कार्यक्षेत्राली संपूर्ण विभाग आज (11मे) रात्री 12 वाजल्यापासून पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत येथे पूर्णत: बंद पाळण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिकेने ट्वीट करत माहिती दिली आहे.
ठाण्यात लॉकडाउनचे आदेश जाहीर केल्यानंतर सुद्धा नागरिक घराबाहेर पडत आहेत. ऐवढेच नाही तर भाजीपाला खरेदी करताना गर्दी करत सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडवला जात आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करुन सुद्धा नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. रस्ता, दुकाने, भाजीपाला मार्केट येथील गर्दी कमी झाली नसल्याचे ही दिसून आले आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच कारणास्तव आता लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विभागात बंद पाळण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या काळात फक्त दुध डेअरी आणि औषधांची दुकाने सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(Lockdown: राज्यात दारुची दुकानं सुरु केली, मग मंदिरही खुली करा; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून मागणी)
दरम्यान, ठाण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 2592 वर पोहचला असून आतापर्यंत येथे 23 जणांचा बळी गेला आहे. नागरिकांना वारंवार घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत असले तरीही त्यांच्याकडून या नियमाचे पालन केले जात नाही आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 23 हजारांच्या पार गेला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आले आहे पण त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही हे नागरिकांनी लक्षात घ्यावे असे म्हटले होते.