Thane: येत्या शनिवारी व रविवारी Kopri Bridge वाहतुकीसाठी बंद; प्रवाशांना पर्यायी मार्ग घेण्याचा सल्ला, पहा Diversions
या पुलाच्या कामादरम्यान फुटओव्हर पुलामुळे समस्या निर्माण होत होती, ते तोडण्याचे काम गेले काही दिवस चालू आहे.
ईस्टर्न एक्स्प्रेस वेच्या (Eastern Express Highway) कोपरी पुलाचे (Kopri Bridge) काम एमएमआरडीएने (MMRDA) सुरू केले आहे. या पुलाच्या कामादरम्यान फुटओव्हर पुलामुळे समस्या निर्माण होत होती, ते तोडण्याचे काम गेले काही दिवस चालू आहे. हे काम अद्याप सुरू असून यामुळे येत्या विकेंड (शनिवार-रविवारी) कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे. हा पूल मुंबईवरून ठाण्याला जाणाऱ्या आणि ठाण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 9 आणि रविवारी रात्री 11 ते सोमवार ते सकाळी 6 या वेळेत हलक्या व अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून, त्यांच्या गंतव्यस्थानावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग आणि बदललेल्या मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हलक्या वाहनांसाठी -
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेमार्गे ठाणे आणि नाशिक-मुंबई महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी कोपरी पुलाकडे जाणारा नौपाडा सर्व्हिस रस्ता बंद राहणार आहे. त्याऐवजी ठाणे आणि नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रवासी ऐरोली पुलाचा मार्ग घेऊन पूर्व द्रुतगती महामार्गावर पोहोचू शकतात. घोडबंदर रोडहून प्रवास करणार्यां लोकांना तीन हाथ नाका येथून डावीकडून एलबीएस रोड किंवा आनंद नगर चेकपोस्ट मार्गे मुंबईला जाता येईल.
अवजड वाहनांसाठी -
नाशिक महामार्गामार्गे ठाण्याहून मुंबईकडे जाताना खरेगाव टोल नाका बंद राहील. घोडबंदर रोडमार्गे जाणाऱ्या लोकांसाठी माजिवडा पुलाखालचा रस्ता व डावीकडे जाण्याचा रस्ताही बंद ठेवण्यात येणार आहे. त्याऐवजी ते पूर्व द्रुतगती महामार्गाद्वारे मुंबईत जाण्यासाठी ऐरोली पूल घेऊ शकतात. (हेही वाचा: राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर वाढणार? काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे)
दरम्यान, रेल्वेने कोपरी रेल्वे पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक ठरविला आहे. त्यामुळे रेल्वे पुलाच्या निर्माणाचे काम एमएमआरडीए आणि मध्य रेल्वेकडून सुरू आहे. या रेल्वे पुलाच्या निर्माणामध्ये पादचारी पूल अडचण ठरत असल्याने तो तोडण्याचे काम सध्या सुरु आहे.