Thane Integral Ring Metro Rail: ठाणेकरांसाठी खुशखबर! शहरात बांधला जात आहे 29-किमी लांब इंटिग्रल रिंग मेट्रो मार्ग, असतील 22 स्थानके, जाणून घ्या मार्ग व प्रकल्प तपशील

काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या सहा स्थानकांसाठी तपशीलवार आराखडे तयार केले जातील. भू-तांत्रिक तपासणीनंतर, उर्वरित 14 स्थानकांच्या डिझाइनसाठी निविदा काढल्या जातील.

Thane Integral Ring Metro Rail (संग्रहित-संपादित-प्रातिनिधिक प्रतिमा)

Thane Integral Ring Metro Rail: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र मंत्रिमंडळाने या आठवड्याच्या सुरुवातीला ठाण्यातील इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला (Integral Ring Metro Rail Project) मंजुरी दिली. या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील आंतर-कनेक्टिव्हिटी तर सुधारेलच, पण मोठ्या व्यावसायिक केंद्रांना जोडणारा हा कॉरिडॉर कर्मचाऱ्यांच्या मोठ्या वर्गासाठी एक प्रभावी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देईल. साधारण 12,200.10 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाचा हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) च्या लँडस्केपमध्ये हा प्रकाप क्रांती घडवून आणेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रोसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ((MMRCL or MahaMetro) या महत्त्वाच्या प्रकल्पाचे नेतृत्व करणार असून, एमएमआरमधील त्यांचा पहिला ग्रीनफील्ड उपक्रम आहे. सात वर्षांपासून नियोजनाखाली असलेला हा प्रकल्प यापूर्वी ठाणे महापालिकेने हाती घेतला होता.

ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प-

इंटिग्रल रिंग मेट्रो मार्ग वागळे इस्टेट, मानपाडा, वाघबीळ, बाळकुम, राबोडी आणि ठाणे रेल्वे स्थानकासह ठाण्यातील काही सर्वात गजबजलेल्या भागामधून जाईल. पहिल्या टप्प्यावर, वॉटरफ्रंट (हिरानंदानी इस्टेट), वाघबीळ, विजय नगरी, डोंगरीपाडा, मानपाडा आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या सहा स्थानकांसाठी तपशीलवार आराखडे तयार केले जातील. भू-तांत्रिक तपासणीनंतर, उर्वरित 14 स्थानकांच्या डिझाइनसाठी निविदा काढल्या जातील. एकूण 29 किमी लांबीचा हा कॉरिडॉर ठाणे शहराच्या पश्चिमेकडील परिघावर 22 स्थानकांसह धावेल. (हेही वाचा: Mumbai Metro Line 3: आज PM Narendra Modi करणार मुंबईमधील मेट्रो लाइन 3 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन; जाणून घ्या स्थानकांची नावे, तिकीट दर आणि वेळापत्रक)

हा मार्ग एका बाजूला उल्हास नदी आणि दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) यांनी वेढलेला आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने 2 ते 3 किमी भूमिगत नेटवर्कसह एक उन्नत कॉरिडॉर आहे.

ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रोची 22 स्थानके-

रायला देवी, वागळे सर्कल, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाजी नगर, नीळकंठ टर्मिनल, गांधी नगर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट, पाटलीपाडा, आझाद नगर बस स्टॉप, मनोरमा नगर, कोलशेत औद्योगिक क्षेत्र, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी, शिवाजी चौक, ठाणे जंक्शन (भूमिगत) आणि नवीन ठाणे (भूमिगत).

दरम्यान, महामेट्रोला अपेक्षित आहे की, या प्रकल्पामुळे 2029, 2035 आणि 2045 या वर्षांसाठी अनुक्रमे 6.47 लाख, 7.61 लाख आणि 8.72 लाख प्रवासी एकूण दररोज प्रवास करतील. महामेट्रोला एकूण कॉरिडॉरच्या अंदाजे 8 किमीच्या डिझाइनसाठी पाच सल्लागारांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.