Thane Covid-19 Recovery Rate: कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणामध्ये ठाणे शहर भारतात दुसऱ्या क्रमांकावर; शहरातील रिकव्हरी रेट 89 टक्क्यांवर
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. ठाणे शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्क्यांवर आले असून राज्याचे हे प्रमाण 71 टक्के आहे. त्यामुळे ठाणे शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे राज्यात पहिल्या, तर देशात दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Thane Covid-19 Recovery Rate: सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. ठाणे शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्क्यांवर आले असून राज्याचे हे प्रमाण 71 टक्के आहे. त्यामुळे ठाणे शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे राज्यात पहिल्या, तर देशात दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सध्या ठाण्यात 21139 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या ही 1940 इतकी आहे. याशिवाय ठाण्यातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही 102 दिवसांवर आले आहे. त्यामुळे ठाणे शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं दिसून येत आहे. (हेही वाचा - Coronavirus in India: देशातील कोरोना बाधितांचा आकडा 28,36,926 वर; मागील 24 तासांत 69,652 नव्या रुग्णांची मोठी भर)
दरम्यान, ठाणे शहरात मार्च महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत होती. त्यानंतर मे, जूनमध्येदेखील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. मात्र, या काळातही ठाणे महापालिकेनेही दोन वेळा लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला.
ठाण्यात जागतिक पातळीवर कौतुकास्पद ठरलेला धारावी पॅटर्न वापरण्यात आला. त्यामुळे येथील कोविड 19 रुग्णाच्या संख्येत मोठी घट झाली. ठाणे शहरातील प्रत्येक रुग्णाचे जिओ टॅगिंग करण्यात आले. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या 43 व्यक्तींना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. याशिवाय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महापालिकेने केलेल्या उपाय योजनांमुळे महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.