Thane Gangrape: संतापजनक! वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
धक्कादायक बाब म्हणजे, पीडिताने तब्बल सात महिन्यानंतर रविवारी (14 फेब्रुवारी) या घटनेची वाच्यता केली आहे.
ठाणे (Thane) ग्रामीणमध्ये एका 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडिताने तब्बल सात महिन्यानंतर रविवारी (14 फेब्रुवारी) या घटनेची वाच्यता केली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याप्रकरणी चार जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, हे चारही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पिडिताच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गेल्या वर्षी जुलै महिन्यात दुकानातून किरकोळ सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर घरी परत येत असताना आरोपीपैंकी एकाने तिला गावाजवळील एका जुन्या बंगल्यात जाण्यास सांगितले. त्यानंतर त्या मुलासह इतर तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला. परंतु, या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांना जीवे मारू, अशी धमकीही आरोपींनी तिला दिली होती. यानंतर काही दिवसांनी दोन आरोपींनी तिला पुन्हा बंगल्यात घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला आहे. या संदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- Mumbai: धक्कादायक! मुंबईच्या नायर रुग्णालयात एका 26 वर्षीय डॉक्टराची आत्महत्या; कारण अस्पष्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आपल्या मुलीकडे पाहून अश्लील वर्तन करताना एका आरोपीला तिच्या वडिलांनी पाहिले. त्यानंतर दोघांत भांडण झाल्यानंतर पीडिताने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला संपर्क साधला. त्यानंतर चौघांविरूद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.