Thane: ठाण्यात Deputy Collector सह तिघांना कोरोना विषाणूची लागण; कलेक्टर ऑफिसमधील संक्रमितांची संख्या 18 च्या वर
ठाणे (Thane) येथील कोरोना ग्रस्तांची संख्या 15 हजाराच्या वर गेली आहे. या विषाणूने आता फ्रंटलाईन वर लढणाऱ्या अनेक लोकांना आपल्या कवेत घेतले आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांच्या संख्येने 3 लाख 10 हजाराचा टप्पा पार केला आहे. ठाणे (Thane) येथील कोरोना ग्रस्तांची संख्या 15 हजाराच्या वर गेली आहे. या विषाणूने आता फ्रंटलाईन वर लढणाऱ्या अनेक लोकांना आपल्या कवेत घेतले आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालया (Collector Office) मध्ये 4 नवीन कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. रविवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या चार कर्मचार्यांमध्ये उप जिल्हाधिकारी (Deputy Collector) आणि त्यांचा ड्रायव्हर, कलेक्टरचा वैयक्तिक सहाय्यक आणि ड्रायव्हर यांचा समावेश आहे. या सर्वांना सध्या आयसोलेशनमध्ये थावण्यात आले आहे.
त्यापैकी एकाला इतरही काही आजार असल्याने, लवकरच या व्यक्तीलाही रुग्णालयात दाखल केले जाईल, असे उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी मुंबई मिररला सांगितले. या चार नवीन प्रकरणांसह आतापर्यंत एकूण कोरोना विषाणूची लागण झालेल्या कर्मचार्यांची संख्या 18 वर पोहोचली आहे. त्यापैकी 10 अधिकारी व कामगार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कार्यरत होते, तर इतर आठ जण लॉक डाऊन सुरु झाल्यापासून फिल्डवर काम करत होते. (हेही वाचा: पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना व्हायरस मुळे तीन सख्ख्या भावांचा मृत्यु; वाचा कलापुरे कुटुंबाची हृदयस्पर्शी व्यथा)
जिल्हाधिकारी कार्यालयात जवळपास शंभर कर्मचारी असून गेल्या चार महिन्यांपासून ते 50 टक्के क्षमतेने कार्यरत आहे. 'हे कर्मचारी अंबरनाथ, कल्याण, बदलापूर आणि शहापूरहून बसेस आणि गाड्यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करुन प्रवास करीत होते. तेथे त्यांना विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे,' असे पाटील म्हणाले. कदाचित डेप्युटी कलेक्टर आणि इतर कर्मचारी या सकारात्मक रूग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, ठाणे जिल्हाधिकारी यांचे कार्यालय ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांच्या कामकाजावर देखरेख ठेवते. रविवारी सायंकाळपर्यंत एकूण 67,605 रुग्णांची नोंद झाली आहे, तर जिल्ह्यात मृतांची संख्या 1,892 आहे. जिल्ह्यात सध्या 23,341 सक्रीय रूग्ण आहेत, ज्यांच्यावर उपचार चालू आहेत.