Jalna Accident: जालन्यात भीषण अपघात; कारच्या धडकेत 3 चिमुकल्यांचा मृत्यू
या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु असून कार चालकाचा शोध त्यांच्याकडून सुरु आहे.
जालनामध्ये दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातामध्ये (Jalna Accident) तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव गाडीने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने ही घटना घडली आहे. मॉलमध्ये शॉपिंग (Shopping Mall) करुन घराच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे. जालना शहरातील मंठा-अंबड बायपास मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर ही घटना घडली आहे. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या अपघाताचा तपास पोलिसांकडून (Jalna Police) सुरु असून कार चालकाचा शोध त्यांच्याकडून सुरु आहे. (हेही वाचा - Businessman Santosh Shinde Suicide Case: कोल्हापूरातील उद्योगपतीच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या माजी नगरसेविका आणि पोलिस अधिकाऱ्याला बेड्या)
नागरिकांनी अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात हलवले, मात्र यात तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. नुरेन फातेमा सादेक शेख (वय 7 वर्षे), आयेजा फातेमा सादेक शेख (वय 5 वर्षे) अदाबिया फातेमा सय्यद शोएब (वत 9 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात दोन जण गंभीर जखमी देखील झाले आहेत.
सय्यद शोएब हे आपल्या मुलासह साडूच्या मुलांना घेऊन सायंकाळी पाचच्या सुमारास मोतीबागेत खेळण्यासाठी घेऊन गेले होते. त्यानंतर ते सर्व मॉलमध्ये गेले. मॉलमध्ये खरेदी करुन घरी जात असतानाच पाठीमागून येणाऱ्या गाडीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ज्यात त्यांची मुलगी अदाबियासह त्यांच्या साडूचे मुलं नुरेन आणि आयेजा यांचा जागीच मृत्यू झाला. तर शोएब आणि आणखी एक जण जखमी झाले आहेत.