Tejas Thackeray: राजकारणात तेजस ठाकरे यांची एन्ट्री? मुंबईत झळकलेल्या पोस्टरमुळे राजकीय चर्चांना उधान
ही चर्चा अधूनमधून नेहमीच होत असते. मात्र, मुंबईत झळकलेल्या एका पोस्टरमुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना सध्या अत्यंत खडतर मार्गावरुन मार्गक्रमण करते आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी अभूतपूर्व बंड केले. शिवसेना नेतृत्व आणि संपूर्ण पक्षासह राज्याच्या राजकारणालाही हा अत्यंत मोठा धक्का होता. या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) आणि चिरंजीव आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) जोरदार सक्रीय झाले. दरम्यान, आता उद्धव आणि आदित्य यांच्यासोबतच तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हेसुद्धा राजकारणात एन्ट्री करणार का? याबाबत चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. ही चर्चा अधूनमधून नेहमीच होत असते. मात्र, मुंबईत झळकलेल्या एका पोस्टरमुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.
'आजची शांतता, उद्याचं वादळ'
गिरगाव परिसरात शिवसेना पदाधिकाऱ्याकडून झळकलेल्या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टरवर तेजस ठाकरे यांचा फोटो आणि ''आजची शांतता, उद्याचं वादळ... नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव ठाकरे'' हे शब्द अधिक उठावदार टाईपमध्ये लिहीली आहेत. हे शब्द आणि पोस्टर पाहणाऱ्यांच्या लगेच नजरेत भरते आहे. त्यामुळे पोस्टर पाहून उपस्थितांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. (हेही वाचा, Tejas Thackeray यांनी पश्चिम घाटात शोधल्या ‘घाटियाना’ आणि ‘सह्याद्रीना’ कुळातील खेकड्यांच्या प्रजाती)
राजकीय उपस्थिती अपवादानेच
तेजस ठाकरे हे रश्मी आणि उद्धव ठाकरे यांचे धाकले चिरंजीव आणि आदित्य ठाकरे यांचे छोटे बंधू आहेत. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासारखा अथवा मुंबईतील महाविकासआघाडीचा मोर्चा यांसारखा अपवाद वगळता तेजस ठाकरे हे राजकीयदृष्ट्या फारसे कुणाला जाहीरपणे दिसले नाहीत. निसर्गातील जैवविविधता शोधणे वन्यजीव छायाचित्रण आणि संशोधन, हा त्यांच्या अभ्यासाचा आणि आवडीचा विषय आहे. आतापर्यंत त्यांनीखेकड्यांच्या अकरा प्रजाती आणि सापाची एक प्रजाती शोधल्या आहेत. ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली आहे.
'तेजस गरम डोक्याचा पोरगा'
तेजस ठाकरे हे राजकीय मंचावर फारसे दिसले नाहीत. एकदा शिवतीर्थावरील भाषणात मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांचा उल्लेख 'गरम डोक्याचा पोरगा' अशी केली होती. तेव्हापासूनच अनेक शिवसैनिकांच्या मनात तेजस ठाकरे यांच्याबद्दल आकर्षण आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी तेजस ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश करावा असे म्हटले आहे.