Swachh Mumbai WhatsApp Helpline: मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईनचा शुभारंभ; कचरा, डेब्रिजबाबत आठ तासांत होणार कार्यवाही, जाणून घ्या नंबर

दि. १ ते ५ जून दरम्यान १०२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण केल्याचे महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (संग्रहित संपादित प्रतिमा)

नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून, ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा (८१६९६८१६९७) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ व कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबईतील पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन’ वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासांत त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या प्रणालीसाठी महानगरपालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओव्हरसिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्या माध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. मुंबईत सुशोभिकरणाचे १,१५० प्रकल्प सुरू असून त्याचे दृश्यस्वरुपात बदल दिसत आहेत. रोषणाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत १७० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. कोळीवाड्यांचा विकास, प्रदुषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (हेही वाचा: मुख्यमंत्री Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केली निर्माणाधीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची हवाई पाहणी)

नालेसफाई बाबत तक्रारीसाठी मुंबई महानगरपालिकेने संपर्क क्रमांक यंत्रणा उपलब्ध करून दिली असून १५ जूनपर्यंत तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. दि. १ ते ५ जून दरम्यान १०२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण केल्याचे महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले.