कॉंग्रेस नेते Sushilkumar Shinde यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोलापूरात सुशील, सुशीलकुमार नावाच्या व्यक्तींना 501 रुपयांचे मोफत पेट्रोल

वाढते इंधनदर सामान्यांचं जगणं मुश्किल करत आहे. केंद्र सरकारचा निषेध म्हणून आपल्या नेत्याच्या नावाचा गौरव करत उपक्रम राबवत असल्याचं नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले आहे.

Petrol Pump | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या बर्थ डे चं औचित्य साधत आज सोलापुरमध्ये यशदा युवती फाउंडेशनच्या वतीने सुशीलकुमार किंवा सुशील नाव असलेल्या व्यक्तींना 501 रुपयांचे पेट्रोल मोफत दिले जात आहे. आज हा कार्यक्रम सकाळी साडेनऊ ते दुपारी 1 या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती नगरसेविका व फाउंडेशनच्या संस्थापक फिरदोस पटेल यांनी दिली आहे. सोलापूर मध्ये सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंपावर हा कार्यक्रम सुरू आहे. मोफत पेट्रोल हे संबंधित व्यक्तीचं आधारकार्ड पाहून दिले जात आहे.

आज सकाळी पेट्रोल पंपावर आलेल्या व्यक्तीला फेटा बांधून त्याचं स्वागत करून मोफत पेट्रोल देण्यात आले आहे. (नक्की वाचा: सोलापुर: रक्तदान शिबिराचा भन्नाट उपक्रम, रक्तदात्याला पाच लिटर पेट्रोल मोफत!).

सध्या देशात पेट्रोल शंभरी पार आहे. वाढते इंधनदर सामान्यांचं जगणं मुश्किल करत आहे. केंद्र सरकारचा निषेध म्हणून आपल्या नेत्याच्या नावाचा गौरव करत उपक्रम राबवत असल्याचं नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले आहे. यंदा शिवसेनेने देखील त्यांच्या वर्धापन दिनी भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवा आणि एक लिटर पेट्रोल फ्री मिळवा असा  उपक्रम राबवत वाढत्या इंधन दरांवरुन केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या भाजप वर निशाणा साधला होता.

सध्या मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.39 रुपये आणि डिझेलसाठी 96.33 रुपये मोजावे लागत आहेत. सप्टेंबर महिन्यात सध्या इंधनाचे दर सरकार आणि ऑईल कंपन्यांकडून स्थिर ठेवण्यात आले आहेत.

सध्या इंधनाचे दर कमी करणे शक्य नाही. यूपीए सरकारच्या काळात झालेल्या काही निर्णयांमुळे आता नागरिकांना हे भोगावे लागत असल्याची प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.