Sushant Singh Rajput Death Case: गोपीनथ मुंडे, न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करा: शिवसेना

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसातील जो अधिकारी महाराष्ट्रात आला होता तो कोणाच्या गाडीतून मुंबईत फिरत होता, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी या वेळी केली.

Gopinath Munde, Sushant Singh Rajput, Justice Loya | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Death Case) प्रकरणात भाजप ज्या पद्धतीने सीबीआय (CBI) चौकशीची मागणी करत आहे तशीच गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि न्यायमूर्ती लोया (Justice Loya) यांच्या मृत्यू प्रकरणाचीही करा, असे शिवसेना (Shiv Sena) खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आणले जात आहे. त्याबाबत आणि बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे याबाबत एका खासगी वृत्तवाहीणीच्या कार्यक्रमात सावंत बोलत होते.

या वेळी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, राज्य सरकारने मागणी केल्याशिवाय सीबीआय चौकशी करु शकत नाही. हे कायद्याचे राज्य आहे. एखाद्या प्रकरणात देशातील कोणत्याही राज्यात अथवा राज्यातील कोणत्याही गावात तक्रार दाखल झाली तर ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये ते प्रकरण वर्ग करतात. मात्र, घटनने घालून दिलेली मर्यादा आणि नियम याला डावलून बिहार पोलिसांनी आणि राज्य सरकारने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपासा सीबीआयकडे दिला आहे, असेही अरविंद सावंत या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Death Case सीबीआय कडे सोपवण्यास मुंंबई पोलिसांंचा विरोध, सुप्रीम कोर्टात दाखल केले Affidavit)

दरम्यान, एखाद्या व्यक्तिमत्वाला बदनाम करायचे यासाठी जाणीवपूर्वक भाजपकडून अशा प्रकारची कृती केली जात आहे, असा आरोपही सावंत यांनी केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसातील जो अधिकारी महाराष्ट्रात आला होता तो कोणाच्या गाडीतून मुंबईत फिरत होता, याचीही चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी या वेळी केली. तसेच, बिहार पोलिसांना या प्रकरणाची चौकशी चौकशी करण्याचा अधिकार नसल्याचेही सावंत या वेळी म्हणाले.