महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना मारहाण; चाकूने करण्यात आले वार
शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार केली आहे.
राज्यभर मतदानाचे काहीच तास बाकी असता, अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला मारहाण करण्यात आली तर आता शिवसेनेतील बंडखोर अपक्ष उमेदवारावर हल्ला करण्यात आला.
करमाळा या मतदार संघात हा मारहाणीचा प्रसंग घडला आहे. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार केली आहे. नारायण यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली असल्याचा आरोप केला आहे.
या मारहाणीत नारायण पाटील यांचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत तर संपूर्ण परिसरात या घटनेनंतर दहशत पसरली आहे.
बाळु जगताप, बापुराव जगताप, संतोष देवकर, पिंटु जगताप, औंदुबर खोचरे, गणेश जगताप,अनिल जगताप, सुभाष जगताप अशी नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांची नावे असून त्यांना मारहाण करताना त्यांच्या अंगावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. या सर्व जखमींवर टेंभुर्णी येथे उपचार सुरू आहेत.
आज राज्यातल्या सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.