भाजपमध्ये होणार संघटनात्मक बदल, लवकरच होणार नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मात्र, राज्यपालांना भेटून सरकारस्थापनेचा दावा करण्याबाबत मात्र मुनगंटीवार यांनी मौन बाळगले. त्यामुळे भाजप उद्या सत्तास्थापनेचा दावा करणार का? याबाबत उत्सुकता आहे.

BJP | (Photo Credit: Archived, edited, representative images)

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असताना भाजपमध्ये संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ही माहिती दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लवकरच राज्यात नवा भाजप प्रदेशाध्यक्ष (BJP State President) निवडला जाईल. तसेच, राज्यातील जिल्हा आणि स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचीही निवड केली जाईल. मुनगंटीवार यांच्या माहितीनंतर विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना बदलले जाणार आहे का? असे विचारले असता 'मी केवळ नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल असे म्हटले आहे', असे सांगत मुनगंटीवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली.

दरम्यान, चंद्रकात पाटील आणि आपण (मुनगंटीवार) उद्या (गुरुवार, 6 नोव्हेंबर 2019) राज्यपालांच्या भेटीसाठी जात आहोत. या भेटीत आपण फक्त राज्यपालांना राजकीय स्थितीची माहिती देणार आहोत, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. मात्र, राज्यपालांना भेटून सरकारस्थापनेचा दावा करण्याबाबत मात्र मुनगंटीवार यांनी मौन बाळगले. त्यामुळे भाजप उद्या सत्तास्थापनेचा दावा करणार का? याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, शिवसेनेचा मुख्यमंत्री हिच गोड बातमी, संजय राऊत यांचा पुनरुच्चार)

महत्त्वाचे म्हणजे शिवसेना या मित्रपक्षासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नसतानाच भाजपचे शिष्टमंडळ राज्यापालाच्या भेटीला निघाले आहे. त्यामुळे या शिष्टमंडळात शिवसेनेचा एकही सदस्य असणार नसल्याची माहिती आहे. या भेटीत भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार की, राष्ट्रपती राजवटीबाबत चर्चा करणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे असे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या शिष्टमंडळात असणार नाहीत.