दिलासादायक ! नायर रुग्णालयात आतापर्यंत 500 कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीची यशस्वी प्रसुती

इतक्या मोठ्या संख्येने सुखरुप प्रसुती होणारं हे एकमेव केंद्र ठरलं आहे. या घटनेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबई शहरात आढळून येत आहेत.

Coronavirus | Representational, Edited Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात (Nair Hospital) कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीच्या (Corona Positive Pregnant Women) यशस्वी प्रसुतीचा 500 वा टप्पा पार केला आहे. इतक्या मोठ्या संख्येने सुखरुप प्रसुती होणारं हे एकमेव केंद्र ठरलं आहे. या घटनेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबई शहरात आढळून येत आहेत.

मुंबईच्या नायर रुग्णालयात आतापर्यंत 500 कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतींची यशस्वी प्रसुती करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्व महिलांनी दिलेल्या बाळांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आहे. त्यामुळे वैद्यकिय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घटनेनंतर नायर रुग्णालयातील डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात आज 99 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

दरम्यान, नायर रुग्णालयात 14 एप्रिलपासून आतापर्यंत एकूण 723 गर्भवती महिलांवर उपचार करण्यात आले आहेत. यातील 656 मातांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नायर रुग्णालयात आतापर्यंत 500 कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतींची प्रसुती करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गर्भवतींना सरकारी आणि महापालिका रुग्णालयांच प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलं. यासाठी नायर रुग्णालयात एका प्रसुती विभागाची निर्मिती करण्यात आली होती. नायर रुग्णालयाबरोबरचं महापालिकेच्या सायन रुग्णालयातदेखील कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती मातांची प्रसुती करण्यात आली होती. या रुग्णालयात आतापर्यंत 300 गर्भवतींची यशस्वी प्रसुती करण्यात आली आहे.