Mumbai: आंब्याच्या झाडावरुन पडून मेडिकल विद्यार्थ्याचा मृत्यू, वरिष्ठ डॉक्टरांनी तातडीने उपचार न केल्याचा आरोप
बुधवारी रात्री दयानंद आंबे काढण्यासाठी अशोकाच्या झाडावरून आंब्याच्या झाडावर जात असताना, झाडाची फांदी तुटली आणि तो खाली पडला.
मुंबईतील वरळी येथील पोद्दार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये आंब्याच्या झाडावर चढलेल्या एका मेडिकलच्या विद्यार्थ्याचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाला. दयानंद काळे असे या 22 वर्षाच्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बीएएमएस अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत होता. झाडावरुन खाली पडल्यावर प्राथमिक उपचारासाठी त्याला पोद्दार रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्याला पुढाली उपचारासाठी नायर रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान झाडावरुन खाली पडल्यानंतर पोद्दार रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार केले नाही, तसेच त्याला प्राथमिक सुविधाही पुरविण्यात आल्या नसल्याचा आरोप दयानंद काळे याच्या सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने केला आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी बाह्यरुग्ण विभाग बंद करीत जोरदार आंदोलन केले. मात्र रुग्णालय प्रशासनाने हा आरोप खोडून काढला आहे.
रुग्णालयाच्या आवारात आंबा आणि अशोकाचे झाड एकमेकांना लागून आहे. बुधवारी रात्री दयानंद आंबे काढण्यासाठी अशोकाच्या झाडावरून आंब्याच्या झाडावर जात असताना, झाडाची फांदी तुटली आणि तो खाली पडला. यावेळी डॉक्टरांनी त्याला तातडीने अपघात विभागामध्ये दाखल केले. मात्र, तेथे असलेल्या वरिष्ठ डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे विद्यार्थ्यांनीच त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात केली.