Pooja Chavan Suicide Case: आमची बदनामी त्वरित थांबवा, नाहीतर मी आत्महत्या करेन, पूजाच्या वडिलांनी मिडियासमोर दिली प्रतिक्रिया

आम्हाला चार दिवस जगू द्या, नाही तर मी आत्महत्या करेन," अशी प्रतिक्रिया लहू चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

Pooja Chavan (Photo Credit: Instagram)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) दिवसेंदिवस वेगवेगळी वळणं घेत आहे. त्यात तिला घेऊन आणि तिच्या कुटूंबाला घेऊन बरीच बदनामी केली जात आहे. यामुळे त्रस्त झालेल्या पूजाच्या वडिलांनी "आमची ही बदनामी त्वरीत थांबवा. आम्हाला चार दिवस जगू द्या, नाही तर मी आत्महत्या करेन," अशी प्रतिक्रिया लहू चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर लहू चव्हाण पहिल्यांदाच मिडिया समोर येऊन ही प्रतिक्रिया दिली आहे. पूजाचे वडिल लहू चव्हाण यांनी या घटनेवर भाष्य करत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी "या प्रकरणात आमची बदनामी करू नका. आमचे अर्धे कपडे काढलेच आहेत. आता पूर्ण कपडे काढू नका. कृपा करा, आता आणखी बदनामी करू नका, अशी हातजोडून विनंती करतानाच तुम्ही आणखी बदनामी केली तर मी आत्महत्या करेन" अशी विनंती सर्वांना केली आहे.हेदेखील वाचा- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही : नीलम गोऱ्हे

"माझी मुलगी खूप चांगली होती. लोकं उगाच तिची बदनामी करत आहेत. राजकारणाच्या दबावाखाली मी बोलत आहे का असंही विचारलं जात आहे. पण माझ्यावर कोणताही दबाव नाही, असं लहू चव्हाण यांनी सांगितलं. मी पुण्याला गेलो होतो. तिथे विचारपूस केली. त्यावेळी पूजा गॅलरीत बसली होती. दीड वाजता ती खाली पडली. चक्कर येत असल्याचं ती सांगत होती, असं तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या मित्राने सांगितलं. सांगा आता मी कुणावर आरोप करू?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान पूजाच्या कर्जाचे डोंगर होते. तिच्यावर 25-30 लाखांचे कर्ज होते. असे त्यांनी सांगितले. त्यामुळे तिने कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असे संकेत देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "गेले काही दिवस काही महिने काही वेळेला आपलं असं लक्षात आलेलं आहे. आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. तर असाही प्रयत्न होता कामा नये व याचबरोबर सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशीतून जनतेसमोर येईल" असे स्पष्टीकरण दिले आहे.