ST Workers Strike: चंद्रपूर येथे 14 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन; राज्य सरकारकडून कारवाईस सुरुवात

अनेकदा समज देऊन आणि विनंती करुनही एसटी कर्मचारी (ST Workers) संपावर आहेत.

MSRTC | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरुच आहे. अनेकदा समज देऊन आणि विनंती करुनही एसटी कर्मचारी (ST Workers) संपावर आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या राज्य सरकारने कारवाईस सुरुवात केली आहे. पहिली कारवाई चंद्रपूर प्रशासनाने संपावर असलेल्या 14 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. यात चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राजूरा आगार, चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या 3 घटकातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अवमान याचिका दाखल करण्यात येईल. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपास सुरुवात केली. प्रामुख्याने चंद्रपुरातील कर्मचाऱ्यांनी तर बेमुदत संपाची हाक दिली. त्यामुळे अपवाद वगळता एकही एसटी आगारातून बाहेर पडू शकली नाही. त्यामुळे राज्य सरकारने अनेकदा संप मागे घेण्याची तसेच कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र, कर्मचारी संपावर कायम होते. (हेही वाचा, ST Workers Strike: कर्मचारी आंदोलन आणि एसटी महामंडळ विलीन करण्याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रतिक्रिया)

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारने केलेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला जातो आहे. आयुष्यभर आम्ही अत्यंत काटेकोर आणि शिस्तीत सेवा दिली. आपले कर्तव्य बजावले त्याचेच राज्य सरकारने आम्हाला फळ दिले अशी भावना कर्मचारी आता व्यक्त करत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आमचे 36 एसटी कर्मचारी हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या बलिदानापुढे हे निलंबन क्षुल्लक आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांनी केलेल्या तीन्ही मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. असे असताना कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची नवीच मागणी केली. यात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही समितीस्थापन केली आहे. ही समिती पुढील विचारविनीमय करुन तोडगा सूचवेल. तरीही कर्मचाऱ्यांचा संप कायमआहे. त्यामुळे हा संप बेकायदेशीर असून त्याविरोधात कोर्टाने सूचना केली आहे की की, अवमान याचिका दाखल करु शकता. त्यानुसार एसटी महामंडळ आता संपाबाबत अवमान याचिका दाखल करत असल्याचे म्हटले आहे.